कारसह दुचाकी जप्त : संशयित गडहिंग्लजमधील
प्रतिनिधी /संकेश्वर
कार गहाण ठेवून पैसे घेणाऱ्या चौघांनी कार लांबविली होती. याप्रकरणी सूत्रधारासह चौघांना हुक्केरी पोलिसांनी गजाआड केल्याची घटना घडली. संशयिताकडून 7 लाख 30 हजार ऊपये किमतीची कार व दुचाकी जप्त केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक एम. एम. तासिलदार यांनी दिली.
रविंद्र दामोद राठोड (वय 38 मूळ रा. औरंगाबाद, सध्या गडहिंग्लज) या सूत्रधारासह साथीदार मंजुनाथ बसाप्पा मदकरी, सोमनाथ आण्णाप्पा पाटील, शिवप्रसाद विश्वनाथ कोरी (सर्व रा. दुंडगे ता. गडहिंग्लज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. चौघांवर गुन्हा दाखल करून त्यांची रवानगी गोकाक येथील उपकारागृहात करण्यात आली आहे.
मुख्य सूत्रधार रविंद्र राठोड हा गडहिंग्लज येथील एमएसआरटीसी येथे दोन वर्षांपूर्वी सेवेत होता. काही कारणामुळे त्याला सेवेतून निलंबित केले होते. दरम्यान, जुलैमध्ये हंदीगुड येथून कार चोरी झाल्याची फिर्याद हुक्केरी पोलीस स्थानकात दाखल झाली होती. याप्रकरणी पोलीस तपास सुरू होता. असे असतानाच मंगळवार दि. 17 रोजी हुक्केरी पोलीस संकेश्वरनजीक हिटणी नाक्यावर संशयितरित्या फिरणाऱ्या राठोड याला पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी चालविली. या चौकशीत त्याने कार चोरी केल्याचे सांगितले. पैसे कमावण्याच्या हव्यासापोटी कार गहाण ठेवून त्याच्यावर रक्कम घ्यायची व काही दिवसांनी साथीदारांच्या मदतीने कार लांबवत होते.









