आंबेवाडी-कडोली रस्त्याची अवस्था, नागरिकांतून तीव्र संताप
बेळगाव : आंबेवाडी ते कडोली हा साधारण तीन ते चार कि.मी.च्या रस्त्याचे डांबरीकरण तीन महिन्यांपूर्वी करण्यात आले. यासाठी तब्बल साडेचार कोटींचा निधी खर्च करण्यात आला. मात्र काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने रस्त्यावर ख•s पडण्यास सुरुवात झाली असून आतील खडी आता बाहेर पडू लागली आहे. त्यामुळे साडेचार कोटींचा रस्ता आणि खडी वेचत बसा, अशी अवस्था निर्माण झाली असून याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. कडोली ते आंबेवाडी हा मार्ग अनेकांना त्रासाचा ठरू लागला आहे. यापूर्वी तर हा रस्ता न झाल्याने अनेक अपघात घडले आहेत. या रस्त्यावरून अवजड वाहतूक अधिक होत असते. पावसाळ्यात तर या रस्त्यावर ये-जा करणे कठीण झाले होते. उन्हाळ्यात मोठमोठे ख•s पडल्याने हा रस्ता डोकेदुखीचा ठरत होता. त्यामुळे या रस्त्याचे काम तातडीने करावे, अशी मागणी करण्यात आली.
तब्बल वर्षांपूर्वीपासून या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली खरी मात्र, हा रस्ता पूर्ण करण्यासाठी 8 महिने लोटले आहेत. काही वर्षांपूर्वी पडलेल्या जोरदार पावसामुळे आंबेवाडी ते कडोली रस्त्याची दुरावस्था झाली होती. पावसामुळे सर्व रस्ता वाहून गेला होता. तर परिसरातील पिकांनाही फटका बसला होता. त्यामुळे हा रस्ता कधी होणार? असा प्रश्न उपस्थित होत होता. दरम्यान, तीन ते चार महिन्यांपूर्वीच हा रस्ता करण्यात आला. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे हा रस्ता आता खराब होवू लागला आहे. तेंव्हा संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा रस्ता करण्यात आला. त्यानंतर समाधान व्यक्त करण्यात आले. दरम्यान, कडोली-आंबेवाडी गावात येणारा रस्ताही करण्यात आला. मात्र त्याचे काम योग्य न झाल्याने समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे अशा प्रकारचे रस्ते न केलेलेच बरे, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या रस्त्यावर शेतकऱ्यांचा प्रवास अधिक आहे. मात्र तिसऱ्या महिन्यातच रस्त्याचे डांबर उखडून खडी बाहेर पडत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. तेंव्हा रस्त्याची तातडीने डागडुजी करावी, अशी मागणी होत आहे.









