50 लाख रुपये रोख, 50 तोळे सोने जप्त
प्रतिनिधी/ लातूर
लातूर जिह्यातील सर्वांत मोठय़ा दरोडय़ातील चार आरोपींना अटक करण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे. यातील चार आरोपींकडून 50 लाख रुपये रोख तसेच 50 तोळे सोने जप्त करण्यात आले असून या दरोडय़ातील आणखी काही आरोपींचा शोध घेणे सुरू आहे. लातूर पोलिसांच्या सामूहिक प्रयत्नातून दरोडय़ाचा तपास लावण्यात यश आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी लातूर शहर उपविभागीय अधिकारी जितेंद्र जगदाळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे, विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे व पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या वेगवेगळ्या पथकाने या दरोडय़ातील आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळविले.
याबाबत अधिक माहिती अशी की, 12 ऑक्टोबर रोजी कातपुर शिवारातील राजकुमार अग्रवाल यांच्या बंगल्यात दरोडा टाकून दोन कोटी 35 लाख रुपये रोख तर अंदाजे दोन किलो दागिने चोरीला गेले होते. या दरोडय़ामुळे लातूर जिह्यात खळबळ उडाली होती. यानंतर पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या सूचनेनुसार वेगवेगळ्या पथकाने या गुह्यातील आरोपींना शोधण्याचे काम सुरू होते. गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, अग्रवाल यांच्या घरी पूर्वी काम करणाऱया बाभळगाव येथील पाचपीर नगर भागात राहणाऱया किशोर घनगाव यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने पुणे येथे राहणाऱया टप्पूसिंग कल्याणी (रा. हडपसर पुणे), बल्लुसिंग अमरसिंग टाक (वय 30, रा. जालना), गणेश कोडिंबा अहिरे (रा. बावची, ता. रेणापूर) या आरोपींची चौकशी केली असता हा गुन्हा उघडकीस आला. यातील मुख्य आरोपी किशोर नारायण घनगाव (रा. पाचपीर नगर, बाभळगाव रोड, लातूर) याने या घटनेतील दरोडय़ातील आरोपींचे सहकार्य घेऊन हा सुनियोजित दरोडा टाकल्याची माहिती देण्यात आली. या दरोडय़ाचा गुन्हा अतिशय जलदगतीने अवघ्या काही दिवसांच्या आत उघडकीस आणून मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, उपविभागीय अधिकारी जितेंद्र जगदाळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे, विवेकानंद पोलीस ठाण्याचे सुधाकर बावकर यांच्यासह सर्व पोलिसांनी सामूहिक प्रयत्नांनी हा दरोडय़ाचा गुन्हा उघडकीस आणला.