वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आम आदमी पक्षाने दिल्लीतील आपल्या चार लोकसभा उमेदवारांची घोषणा केली आहे. दिल्लीत या पक्षाने काँग्रेसशी युती केली असून काँग्रेससाठी सात पैकी तीन जागा सोडल्या आहेत. मंगळवारी या पक्षाने घोषित केलेल्या चार उमेदवारांपैकी तीन जण सध्या दिल्ली विधानसभेचे याच पक्षाचे सदस्य आहेत.
आम आदमी पक्षाने केलेल्या घोषणेनुसार नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघात सोमनाथ भारती यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर पश्चिम दिल्ली मतदारसंघात महाबळ मिश्रा हे पक्षाचे उमेदवार असतील. पूर्व दिल्लीमध्ये कुलदीप कुमार तर दक्षिण दिल्लीत सहीराम हे आम आदमी पक्षाचे उमेदवार आहेत. महाबळ मिश्रा हे पूर्वी काँग्रेस पक्षाकडून खासदार झाले होते. त्यांनी 2022 मध्ये आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. ते आता या पक्षाचे उमेदवार आहेत.
जिंकण्याचा निकष
जो उमेदवार जिंकू शकेल, त्यालाच तिकिट देण्यात आले आहे, असे आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्ली सरकारमधील मंत्री गोपाल राय यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. आपल्या पक्षाने आतापर्यंत लोकसभा निवडणुकीसाठी 10 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.
पंजाबमध्ये युती नाही
आम आदमी पक्ष काँग्रेसशी दिल्ली, गोवा आणि गुजरातमध्ये युती करणार आहे. मात्र पंजाबमध्ये दोन्ही पक्षांची युती झालेली नाही. या राज्यात सध्या आम आदमी पक्षाचे सरकार आहे. येथे हा पक्ष सर्व 13 जागांवर उमेदवार उभे करणार असून त्यांच्यापैकी तीन उमेदवार विद्यमान आमदार असतील अशी शक्यता आहे. काँग्रेसही या राज्यात सर्व जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे.









