नदीचे पाणी दूषित होण्याची शक्यता : शिवारातील पिके-जनावरांना फटका बसणार : कचरा न टाकण्याचे आवाहन
वार्ताहर/किणये
संतिबस्तवाड येथील मुंगेत्री नदीच्या काठावरच फाउंड्रीतील टाकाऊ माती व केरकचरा टाकण्यात येत आहे. यामुळे येणाऱ्या मान्सून काळात नदीचे पाणी दूषित होण्याची शक्यता आहे. याचा फटका मात्र शिवारातील पिकांना व जनावरांना होणार आहे. नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपत नदीच्या काठावर कचरा व फाउंड्रीतील टाकाऊ माती टाकू नये, अशी मागणी या भागातील स्थानिक नागरिक व शेतकरी वर्गातून होत आहे.
मच्छे औद्योगिक वसाहत, नावगे रोड, वाघवडे रोड व संतिबस्तवाड रोड आदी परिसरात विविध प्रकारचे फाउंड्री कारखाने आहेत. या कारखान्यामुळे स्थानिक नागरिकांना बऱ्यापैकी रोजगार उपलब्ध होऊ लागला आहे. मात्र या कारखान्यामधील टाकाऊ मातीपासून मोठ्या प्रमाणात गैरसोय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण काही अपवाद वगळता बरेचजण ट्रॅक्टरमधून या नदीच्या काठावर व रस्त्याच्या बाजूला माती आणून टाकत आहेत. त्यामुळे या परिसराचे सौंदर्य धोक्यात आले आहे.
माती टाकणाऱ्यावर निर्बंध आणण्याची गरज
संतिबस्तवाड-किणये या भागातील मुंगेत्री नदी शेतकऱ्यांसाठी जीवनदायी ठरणारी आहे. मात्र फाउंड्रीमधील टाकाऊ माती व केरकचरा नदी काठावर टाकण्यात येऊ लागला आहे. यावर निर्बंध कसा आणणार, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.
समस्या दरवर्षीचीच, मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष
याचबरोबर वाघवडे, नावगे रस्त्याच्या बाजूला तसेच मच्छे येथील रस्त्याच्या काही ठिकाणी माती टाकण्यात येत आहे. प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिकचा कचरा आदीही नदीच्या काठावर टाकण्यात येत आहे. यामुळे सदर कचरा व माती पावसाळ्यात नदीच्या पाण्यातून प्रवाहीत होणार आहे आणि हाच केरकचरा व फाउंड्रीतील रसायनमिश्रित माती शिवारातील पिकांमध्ये जाते. ही समस्या दरवर्षीचीच आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी शेतकरी वर्गातून होत आहेत. फाउंड्रीतील मातीची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी कारखानदार मालकांची असते. काही मालक ही टाकाऊ माती टाकण्याचे कंत्राट ट्रॅक्टर चालकाला देत आहेत. काहीजण प्रामाणिकपणे मातीची विल्हेवाट लावत आहेत. तर काही रात्रीच्या वेळी मुंगेत्री नदीच्या काठावर व परिसरातील रस्त्याच्या बाजूला टाकून जात आहेत, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.
नदी काठावर कचरा टाकू नये
या भागात लोकवस्तीचा वावर वाढू लागलेला आहे. यामुळे कचऱ्याची योग्यरितीने विल्हेवाट लावण्याची अधिक गरज आहे. काहीजण दुकानातील टाकाऊ केरकचरा या नदीकाठावर आणून टाकत आहेत. पर्यावरणातील प्रदूषण थांबवण्यासाठी केरकचरा व टाकाऊ माती नदीकाठावर टाकू नये, अशी मागणी करण्यात येत आहे.









