1 लाख लिटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या कामाला सुरुवात
बेळगाव : कॅन्टोन्मेंट व्याप्तीतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे भूमीपूजन सोमवारी पार पडले. रोटरी क्लब ऑफ बेळगाव, अशोक आयर्न संचलित जयभारत फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने मटण बुचर रोड येथे 1 लाख लिटर क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली. यामुळे कॅम्पमधील सांडपाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी उद्यानांना वापरले जाणार आहे. कॅन्टोन्मेंटचे सीईओ राजीव कुमार, नामनिर्देशित सदस्य सुधीर तुपेकर, जयभारत फाऊंडेशनचे सदस्य अशोक परांजपे, रोटरी क्लब ऑफ बेळगावचे अध्यक्ष जयदीप सिद्दण्णावर यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ बेळगावतर्फे कॅन्टोन्मेंट हद्दीत दोन प्रकल्प राबविले जाणार आहेत. मटण बुचर स्ट्रीट टॉयलेटजवळ 1 लाख लिटर तर मुख्य पोस्ट ऑफिस रोडवरील कर्मचारी वसाहतीजवळ 35 हजार लिटर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारला जाणार असल्याची माहिती रोटरीचे सदस्य पराग भंडारे यांनी दिली.
दुर्गंधीयुक्त सांडपाणी प्रकल्पामध्ये सोडणार
मटण बुचर स्ट्रीट येथे 15×45 आकाराचा सांडपाणी प्रकल्प राबविला जाणार आहे. दुर्गंधीयुक्त सांडपाणी या प्रकल्पामध्ये सोडले जाणार असून, स्वच्छ पाणी विविध कामांसाठी वापरले जाणार आहे. बेळगावसाठी एकूण 1 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले असून, त्यापैकी 76 लाख या दोन्ही प्रकल्पांसाठी वापरले जाणार आहेत. पाण्याची कमतरता जाणवत असताना रोटरीने सांडपाणी प्रक्रिया राबवून पाण्याचा पुनर्वापर करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल सीईओ राजीव कुमार यांनी आभार मानले. यावेळी रोटरी क्लबचे जिल्हा प्रांतपाल शरद पै, मिलिंद पाटणकर, अशोक पै, मनोज मायकेल, कॅन्टोन्मेंटचे कर्मचारी सतीश मन्नोळकर यासह इतर सदस्य उपस्थित होते.









