पंतप्रधान मोदींची मुख्य उपस्थिती : अन्य विविध प्रकल्पांचेही उद्घाटन
वृत्तसंस्था/ वाराणसी
चैत्र नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी शुक्रवारी वाराणसीला पोहोचलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील पहिल्या आणि जगातील तिसऱ्या सार्वजनिक वाहतूक रोप-वेची पायाभरणी केली. 644.49 कोटी रुपयांचा हा प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण होणार आहे. त्यामुळे वाराणसी पॅन्ट ते काशी विश्वनाथ मंदिर आणि दशाश्वमेध घाटापर्यंतचा प्रवास सुकर होणार आहे. देशातील पहिल्या रोप-वेसोबतच त्यांनी संपूर्णानंद विद्यापीठात 1,800 कोटींच्या 28 हून अधिक प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. त्यात सिगरा येथील आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्टेडियमचाही समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी वाराणसी दौऱ्यावर होते. वाराणसीच्या जनतेने ‘मोदी मोदी’चा नारा देत पंतप्रधानांचे स्वागत केले. काही ठिकाणी लोकांनी शंख वाजवून तर काही ठिकाणी फुलांचा वर्षाव करून पंतप्रधानांचे स्वागत केले. रोपवेची पायाभरणी करताना पंतप्रधानांनी त्याचे गुण स्पष्ट केले. हा केवळ देशातील पहिला सार्वजनिक वाहतूक रोपवे नसून जगातील तिसरा रोपवे बनणार आहे. यामुळे वाराणसीतील पर्यटनाला चालना मिळणार असल्याचे सांगितले. वाराणसीमध्ये सध्या अरुद गल्ल्यांमध्ये येथे येणाऱ्या पर्यटक आणि भाविकांना तासन्तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्या पार्श्वभूमीवर येथे तयार होणार रोप-वे पर्यटकांसाठी लाभदायी ठरणार आहे. या रोप-वेमुळे वाराणसी कँट आणि विश्वनाथ कॉरिडॉरमधील अंतर काही मिनिटांनी कमी होईल, असे मोदी म्हणाले









