सरकारने घोळ घातल्याने उचलले पाऊल, प्रकल्पाचा सातत्याने पाठपुरावा केल्याकडे वेधले लक्ष
मडगाव : ‘जी-सुडा’मार्फत माडेल, फातोर्डा येथे उभारण्यात येणाऱया पार्किंग प्रकल्पाच्या पायाभरणीसंदर्भात सरकारने घोळ घातल्यानंतर फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी फातोर्डा आणि मडगावच्या नागरिकांना घेऊन सदर प्रकल्पाची पायाभरणी करून टाकली.
यावेळी बोलताना सरदेसाई यांनी एकंदर घोळाविषयी वाच्यता केली. 3 मार्च रोजी संध्याकाळी 4.30 वा. पायाभरणी ठरविली होती. माझा सहभाग निश्चित करण्यासाठी पायाभरणीच्या कोनशिलेची प्रतिमा मला पाठवली गेली होती. या कार्यक्रमाला नगरविकासमंत्री उपस्थित राहणार होते. पण त्याच्या आदल्या दिवशी रात्री 9 च्या सुमारास मला फोनवरून कळविण्यात आले की, आमदार दिगंबर कामत यांनी कार्यक्रम पुढे ढकलण्यासाठी लंडनहून कॉल केला आहे. मग मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱयांना फोन कॉल केला आणि आम्हाला कार्यक्रम पुढे ढकलल्याचा ई-मेल आला, असे सरदेसाई यांनी सांगितले. या प्रकल्पाच्या इतिहासावर नजर टाकल्यास 2013 पासून पार्किंग प्लाझासाठी आपण विधानसभेत आवाज उठवत आलो आहे. जून, 2017 मध्ये बबिता आंगले प्रभुदेसाई या नगराध्यक्षा व मी नगरनियोजनमंत्री असताना पालिकेने पार्किंग प्लाझाविषयी ठराव घेऊन तो ‘जी-सुडा’कडे पाठविण्यात आला होता. त्यानंतर सल्लागारांसोबत 15 जानेवारी, 2018 रोजी माझ्या निवासस्थानी बैठक झाली. मार्च, 2018 मधील बैठकीत सादर केलेले दोन डिझाईन्सचे पर्याय आणि नंतर पार्किंग बे निश्चित करण्यात आला, अशी माहिती सरदेसाई यांनी दिली.
दिगंबर कामत यांची भूमिका काय ?
आता निर्माण होणारे प्रश्न असे आहेत की, या प्रकल्पाच्या बाबतीत दिगंबर कामत यांची भूमिका काय आहे. त्यांनी सभागृहात आवाज उठविला का ? तर याचे उत्तर नाही असे आहे. त्यांनी या प्रकल्पावर काही बैठका घेतल्या का ? याचेही उत्तर नाही असे आहे. मग या प्रकल्पाच्या कोनशिलेवर त्यांचे नाव का हवे आहे, असा सवाल सरदेसाई यांनी उपस्थित केला. कामत यांनी या प्रकल्पाबाबत काहीही योगदान दिलेले नाही, अशी टीका त्यांनी केली. मडगावात तीन ठिकाणी मोठय़ा खुल्या जागा आहेत. जुना मासळी बाजार, जुने बसस्थानक आणि पिकअप स्थानक. गेल्या 30 वर्षांत आमदार कामत त्यापैकी एकही जागा विकसित करू शकलेले नाहीत. त्यातील 5 वर्षे तर ते मुख्यमंत्री होते, याकडे आमदार सरदेसाई यांनी लक्ष वेधत कामत यांच्यावर शरसंधान केले.









