अखेर अनेक दशकांच्या अंतराळ शोधानंतर आपल्या पृथ्वीला एक बहीण असल्याचे दिसून आले आहे. जेव्हापासून अवकाश संशोधन सुरु झाले आहे, तेव्हापासून पृथ्वीसारखा ग्रह शोधण्यासाठी शास्त्रज्ञ आकाश पाताळ एक करीत आहेत. या अथांग विश्वात पृथ्वीसारखे दुसरे ग्रह असतील, की ज्यांच्यावर सजीव सृष्टी असेल, असा संशोधकांचा दृढ विश्वास होताच. या विश्वासाला बळ देणारे निष्कर्ष आता हाती लागले आहेत. ही नवी पृथ्वी आपल्यापासून 12 प्रकाशवर्षे दूर आहे. त्यामुळे तिला भेट देणे आपल्याला शक्य होणार नाही. पण तिच्याशी रेडिओ संपर्क प्रस्थापित करणे शक्य होईल. असे संशोधकांना वाटू लागले आहे.

ही पृथ्वी एका लाल रंगाच्या ताऱयाभोवती भ्रमण करीत आहे. हा तारा आपल्याला येथून लाल रंगाचा दिसत आला तरी त्या पृथ्वीवरुन तो कसा दिसतो आणि या ताऱयाचा किती प्रकाश या पृथीवर पडत असेल त्यावर तेथील जीवनाची गुणवत्ता ठरणार आहे. या पृथ्वीवर मानवसदृश बुद्धीमान जीव असेलच असे निश्चितपणे सांगता येत नाही. पण तिच्यावर अन्य प्रकारचे सजीव असण्याची दाट शक्यता दिसून आली आहे. तसेच हरित वनस्पती आणि वातावरण असल्याचेही पुरावे मिळाले आहेत. या पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा शोध लागला असून ते आपल्या पृथ्वीप्रमाणेच असल्याचे दिसून आले आहे. तसेच तेथे पाणी, ऑक्सिजन, हैड्रोजन आणि नैट्रोजन असल्याचेही पुरावे मिळाले आहेत. ज्या ग्रहावर चुंबकीय क्षेत्र नसते, तेथे सजीव सृष्टी असण्याची शक्यता नसतेच. त्यामुळे या पृथ्वीभोवती संशोधकांच्या आशा आता फिरु लागल्या आहेत, हे निश्चित.









