न्हावेली/ वार्ताहर
रात्री साडेनऊ वाजता महेश राऊळ यांना फोन आला की घराच्या छपरावर अजगर अडकलेला आहे. ताबडतोब सर्पमित्र महेश राऊळ मातोंड- सावंतवाडा येथे विकी गावडे यांच्या घरी पोहोचले. घरातून पाहिलं असता माडीच्या छपराच्या कोन्यामध्ये अजगर वेटोळे घालून होता. महेश राऊळ बाहेरून शिडीच्या साह्याने घराच्या छपरावर चढले . पावसामुळे कवले पूर्ण शेवाळलेली होती. पाय टिकत नव्हते तरी अथक प्रयत्नाने सर्पमित्र महेश राऊळ घराच्या डबल छपरावर चढले आणि त्यानंतर जिथे अजगर होता त्या ठिकाणचे पूर्ण नळे बाजूला केल्यावर त्यांनी अजगराला पकडले . पण, अजगराने छपराच्या वाशाला घट्ट वेटोळे घातले होते . त्यामुळे, आपल्या जागेवरून तो हलतही नव्हता.अर्धा तासाच्या अथक प्रयत्नाने अजगराला सुरक्षित रेस्क्यू करण्यात सर्पमित्र महेश राऊळ यांना यश आले. विष्णू नरळे, वनरक्षक तुळस, अभय सावंत आणि केतन पंडित रामू सावंत यांनीही त्यांना विशेष सहकार्य केले. छपरावरून खाली आल्यावर त्यांनी त्या अजगराला सुरक्षितरीत्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. सर्पमित्र महेश राऊळ हे कोणाच्याही घरी साप आला की रात्री अपरात्री ते त्या ठिकाणी पोहचतात. त्यांनी आतापर्यंत अनेक प्रकारचे विषारी बिनविषारी साप मानवी वस्तीतून सुरक्षित रेस्क्यू करून आणि जर उपचाराची गरज असेल तर त्यांच्यावर योग्य तो उपचार करून नैसर्गिक अधिवासात सोडले आहेत.
Previous Articleयेरवडा कारागृहात कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न
Next Article मालवणात विद्यार्थ्यांनी लावलो तरवो !









