वार्ताहर /उचगाव
कल्लेहोळ गावातील गटारींची स्वच्छता न केल्याने कलमेश्वर गल्लीच्या शेवटी पाण्याला पुढे जाण्यासाठी मार्ग नसल्याने पाणी रस्त्यावर साचल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची तक्रार येथील नागरिकांनी केली आहे. तरी सुळगा (हिं.) ग्राम पंचायतीने तातडीने ही समस्या सोडविण्याची मागणी करण्यात येत आहे. गावातील काही गटारींची स्वच्छता ग्राम पंचायतीने न केल्याने गटारीतून वाहणारे सांडपाणी तसेच पावसाचे पाणी रस्त्यावर साचून नाल्याचे स्वरूप निर्माण होत आहे. पाणी ड्रेनेज मिसळीत असल्याने या पाण्याची मोठी दुर्गंधी नागरिकांना सहन करावी लागत आहे. यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचण्याची शक्यता नागरिकांनी वर्तवली आहे. तरी सुळगा ग्राम पंचायतीने तातडीने या पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच कलमेश्वर गल्लीच्या शेवटी साचलेले पाणी पुढे जाण्यासाठी मार्ग मोकळा करावा अन्यथा ग्राम पंचायतीवर मोर्चा काढण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.









