स्थनिक नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय : आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर, तीन ठिकाणी गटारीवरील स्लॅब फोडून काढला कचरा
बेळगाव : संततधार पावसामुळे शहर व उपनगरात जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळे निर्माण झाले असल्याने गटारीतील सांडपाणी रस्त्यांवरून वाहू लागले आहे. विशेष करून एसपीएम रोडवर गटारीतील सांडपाणी रस्त्यावर तुंबले आहे. त्यामुळे याचा फटका स्थानिक रहिवासी व व्यापाऱ्यांना सहन करावा लागत असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. गटारी तुंबून सांडपाणी रस्त्यावर पसरल्याचे समजताच नगरसेवक राजू भातकांडे या ठिकाणी हजर झाले. ठेकेदाराला बोलावून ड्रील मशीनच्या साहाय्याने तीन ठिकाणी गटारीवरील स्लॅब फोडून कचरा काढण्यास सांगितले.
त्यानंतर सांडपाणी वाहून जाण्यास मदत झाली. महानगरपालिकेकडून शहर व उपनगरातील नाले व गटारींची पावसाळ्यापूर्वी सफाई करण्यात आली होती. त्यानंतर मध्यंतरी सफाईचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, सदर सफाई केवळ धूळफेक असल्याचे दिसून येत आहे. कारण सध्या सुरू असलेल्या पावसामुळे सांडपाणी गटारीतून वाहून जाण्याऐवजी ते रस्त्यावरून वाहू लागले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणच्या गटारी केरकचऱ्याने तुंबल्या आहेत. तसेच अडथळे निर्माण झाले असल्याने सांडपाणी वाहून जाण्यास मार्ग नसल्याने सदर पाणी गटारीतून बाहेर येत आहे.
सांडपाण्यातूनच ये-जा करण्याची वेळ
एसपीएम रोडवर सांडपाणी रस्ताभर पसरले असल्याने त्यातूनच स्थानिक रहिवासी व व्यापाऱ्यांना ये-जा करण्याची वेळ आली आहे. परिणामी येथे दुर्गंधी पसरण्यासह नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. गटारीतील सांडपाणी रस्त्यावर तुंबल्याने स्थानिक व्यापारी, दवाखाने व इतर व्यावसायिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला. कपिलेश्वर तलावाकडे जाणाऱ्या मार्गावर दलदल निर्माण झाल्याची माहिती समजताच नगरसेवक राजू भातकांडे यांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेतली.
केरकचरा घंटागाडीकडे देणे गरजेचे
यापूर्वी गटारीचे काम केलेल्या ठेकेदाराने कोठेही चेंबर न सोडता पूर्ण गटारीवर काँक्रीट घातले आहे. त्यामुळे गटार स्वच्छ करणे कठीण झाले आहे. गटारीत प्लास्टिक व इतर प्रकारचा केरकचरा अडकल्याने ठिकठिकाणी गटारीतील सांडपाणी बाहेर आले. लागलीच ड्रीलच्या साहाय्याने तीन ठिकाणी गटारीवरील स्लॅब फोडून अडकलेला कचरा काढण्यात आल्यानंतर पाणी वाहून गेले. त्यामुळे नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून गटारीत प्लास्टिक व इतर प्रकारचा केरकचरा टाकण्याऐवजी महापालिकेच्या घंटागाडीकडे देणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.









