पाटण :
जागतिक वारसा स्थळे म्हणून युनोरकोच्या यादीत वर्ल्ड हेरिटेजमध्ये महाराष्ट्रातील रायगड, राजगड, पन्हाळगड, प्रतापगड, शिवनेरी, लोहगड, सिंधुदुर्ग, साल्हेर, विजयदुर्ग, सुवर्णदर्ग, खांदेरी तसेच तामिळनाडू येथील स्वराज्याची तिसरी राजधानी राहिलेला जिंजी या बारा किल्यांचा समावेश झाला. ही महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अभिमानास्पद गौरवशाली बाब आहे. महाराष्ट्र शासनाने या किल्ल्यांबरोबर राज्यातील इतर लहान-मोठ्या किल्ल्यांकडे संवर्धन व पर्यटनदृष्टीने लक्ष द्यावे, ही मागणी होत असताना राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंच्या पाटण तालुक्यातील दुर्गम ऐतिहासिक असणाऱ्या सुंदरगड, भैरवगड, जंगली जयगड, गुणवंतगड या किल्ल्यांकडे मात्र पर्यटन विभागाचे दुर्लक्ष झाल्याने शिवप्रेमींमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
पाटण तालुका सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात, दऱ्याखोऱ्यात वसलेला आहे. या तालुक्याला शिवकालीन ऐतिहासिक महत्त्व आहे. येथे निसर्गसौंदर्याच्या सान्निध्यात सह्याद्रीच्या माथ्यावर छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेले भैरवगड, सुंदरगड, जंगली जयगड, गुणवंत गड हे किल्ले आपल्या पूर्वजांचा इतिहास जपत आजही ताठ मानेने उभे आहेत. या किल्ल्यांची जपणूक पाटण तालुक्यातील शिवप्रेमी मावळ्यांनी हातात घेतली आहे. हे मावळे वेळोवेळी या किल्ल्यावर रवच्छता राखत आहेत. अगदी शिवजयंतीपासून ते मराठी परंपरेचे दिवाळी, दसरा सर्व सणवार किल्ल्यावर साजरे करत आहेत. शिवप्रेमी मावळ्यांनी या किल्ल्यांवर संवर्धनाचे राखलेले सातत्य यामुळे दिवसेंदिवस पर्यटकांची वर्दळ वाढली आहे.
शिवप्रेमी पर्यटकांच्या दृष्टीने हे किल्ले प्रेक्षणीय स्थळे ठरत आहेत. मात्र शासन वनविभागाच्या अखत्याज्रत येणाऱ्या सुंदरगड (दातेगड), भैरवगड, जंगली जयगड या किल्ल्यांवर शासनाच्या वतीने पर्यटन वाढीसाठी कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत, ही शोकांतिका असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत.
शंभूराज देसाई हे पाटण तालुक्याचे सुपुत्र आहेत. त्यांच्याकडे पर्यटन खात्याची जबाबदारी व जिल्ह्याचे पालकमंत्री पद आहे. शासनाच्या नजरेतून दुर्लक्षित राहिलेल्या या किल्ल्यांकडे शंभूराज देसाई यांच्या पर्यटन विभागाचे लक्ष जाणार का? असा प्रश्न शिवप्रेमींमधून विचारला जात आहे.
- पर्यटन विभागाने लक्ष द्यावे
भैरवगड व जंगली जयगड सह्याद्रीच्या कोकण घाटमाथ्यावर आहेत. या किल्ल्यांवर प्राचीन मंदिरे, पाण्याची टाके, बुरुज, दगडी तटबंदी असे ऐतिहासिक अवशेष पाहायला मिळतात. या किल्ल्यावरून कोकणचे विलोभनीय दृश्य नजरेस येते. तर सुंदरगड येथे वैशिष्ट्यपूर्ण काळ्या कातळात कोरलेला मुख्य खंजीर दरवाजा, दरवाजातील गणपती, हनुमान शिल्प, सर्वात आकर्षण येथील तलवार विहीर व विहिरीतील महादेव मंदिर, पाण्याचे टाके, कोसळलेल्या अवस्थेत बुरुज, दगडी तटबंदी वाडे, राहोट्या यांचे अवशेष पाहायला मिळतात. या तिन्ही किल्ल्यांवर जाण्यासाठी मार्ग, दगडी पायऱ्यांची दुरुस्ती पाण्याचे टाके, विहिरी यांना संरक्षण कठडे, माहिती फलक या प्राथमिक दुरुस्ती आवश्यक आहेत. याकडे महाराष्ट्र शासन पर्यटन विभागाचे लक्ष जाणे आवश्यक आहे.
- तालुक्यातील गड-किल्ल्यांकडे मंत्री देसाई लक्ष देतील
आम्ही गेली वीस वर्षे गड संवर्धनाचे कार्य करतो. सुंदरगड (दातेगड) आणि भैरवगडावरील छत्रपतींचा इतिहास जोपासण्याचे आम्ही नेहमी प्रयत्न करतो. या गडांच्या विकासात्मक वाटचाल व पर्यटन वाढीसाठी स्थानिक ग्रामस्थांना बरोबर घेऊन गेल्या पंधरा वर्षांत अनेकवेळा शासनाला प्रस्ताव सादर केले आहेत. या प्रस्तावाची एक प्रत मंत्री शंभूराज देसाई यांना अर्थखात्याचे राज्यमंत्री असतानाच सादर केली आहे. सध्या ते पर्यटन खात्याचे कॅबिनेट मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. तालुक्यातील ऐतिहासिक गड-किल्ल्यांकडे त्यांचे लक्ष जाईल, अशी धारणा शिवप्रेमी मावळ्यांची आहे.
-लक्ष्मण चव्हाण, गड संवर्धक








