‘तरुण भारत’च्या वृत्ताची घेतली दखल
बेळगाव : फुलबाग गल्ली तसेच फोर्टरोड येथील रस्त्याची दुरवस्था झाली होती. तरुण भारतने या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेऊन बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी बुधवारी या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ केला. मुख्यमंत्र्यांच्या विशेष अनुदानातून हा रस्ता येत्या 8 दिवसात केला जाणार आहे. शहरातील ऑटोमोबाईल बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या फोर्टरोड येथील रस्त्याची दुर्दशा झाली होती. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यामुळे वाहतूक करणे अवघड होत होती. मागील आठ दिवसात झालेल्या पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचून अपघात होत होते. त्यामुळे येथील व्यापारी तसेच नागरिकांतून संताप व्यक्त होत होता. अशीच काहीशी परिस्थिती फुलबाग गल्ली रोड ते तानाजी गल्ली रेल्वेगेट मार्गावर दिसून आली. रस्त्याची दुरवस्था झालेली पाहून आमदार आसिफ सेठ यांनी मुख्यमंत्र्यांच्या विशेष अनुदानातून रस्ता मंजूर केला. बुधवारी दुपारी फुलबाग गल्ली व फोर्टरोड येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ केला. यावेळी आमदारांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानत हा रस्ता येत्या आठ दिवसात पूर्ण केला जाईल. असे सांगितले. यावेळी अमन सेठ, महापालिकेच्या अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.









