लवकरच केंद्र सरकारकडे सादरीकरण : मसुदा समितीचे अध्यक्ष सुरेश प्रभू यांची माहिती
वृत्तसंस्था/ कोलकाता
नवीन राष्ट्रीय सहकारी धोरण जवळपास तयार झाले असून 47 सदस्यीय समिती केंद्र सरकारला मसुदा सादर करण्याच्या प्रक्रियेत आहे. मसुदा समितीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी शनिवारी ही माहिती दिली. कोलकाता येथील मर्चंट्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी गेल्यावषी देशातील सहकार चळवळ मजबूत करण्यासाठी लवकरच एक समर्पित धोरण तयार केले जाईल आणि सुरेश प्रभू राष्ट्रीय स्तरावरील समितीचे प्रमुख असतील असे जाहीर केले होते. समितीच्या सदस्यांमध्ये सहकार क्षेत्रातील तज्ञ, संस्थांचे प्रतिनिधी आणि केंद्रीय मंत्रालयातील अधिकारी यांचा समावेश आहे.
सहकारी संस्थांबाबतचे सध्याचे राष्ट्रीय धोरण 2002 मध्ये तयार करण्यात आले होते. सरकारी आकडेवारीनुसार, भारतात सुमारे 8.5 लाख सहकारी संस्था असून त्यांची सभासदसंख्या सुमारे 29 कोटी आहे. या सहकारी संस्था कृषी प्रक्रिया, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय, गृहनिर्माण, विणकाम, पतपुरवठा आणि विपणन अशा विविध उपक्रमांशी संबंधित आहेत.
जीडीपीमध्ये सहकारी संस्थांचा वाटा वाढणार
नवीन सहकारी धोरणामध्ये भारताचे सामाजिक-आर्थिक परिमाण बदलण्याची क्षमता असल्यामुळे एकूण जीडीपीमध्ये सहकारी संस्थांचा वाटा लक्षणीय वाढेल, असा दावा माजी वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी केला. तसेच कायदेशीर आणि संस्थात्मक चौकटीद्वारे समर्थित सहकार-आधारित आर्थिक विकास मॉडेलला चालना देण्याचा प्रयत्नही या धोरणाच्या माध्यमातून साध्य होईल असे ते म्हणाले.
सहकारी संस्थांना प्रोत्साहन आवश्यक
“मी दीर्घकाळापासून सर्व प्रकारच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सहकारी संस्थांशी निगडीत असून त्यांची क्षमता मला माहीत आहे. कोणत्याही आर्थिक कृतीमुळे लोकांच्या जीवनात मोलाची भर पडते, तर सहकारामुळे संपत्ती निर्माण होण्याबरोबरच व्यावसायिक व्याप्ती वाढवण्यासही मदत होते,” असा दावाही प्रभू यांनी केला. सरकार अर्थव्यवस्थेतील जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये सहकारी संस्थांचा वाटा वाढवण्याचा विचार करत आहे. सहकार मंत्रालयानेही सहकारी स्टोरेज उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सहकारी संस्थांना आणखी प्रोत्साहन देणे ही एक चांगली कल्पना आहे. देशभरात लाखो चौरस मीटर गोदाम विकसित केले जात आहेत, असेही ते पुढे म्हणाले.









