वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मोटर रेसिंग क्षेत्रामध्ये घेतली जाणारी फॉर्म्युला ई मोटार शर्यतीचे हैदराबादमध्ये पुनरागमन होत आहे. 2024 च्या मोटर रेसिंग हंगामामध्ये फॉर्म्युल ई मोटर शर्यत हैदराबाद शहरात होणार असल्याची घोषणा आयोजकांनी केली आहे.
यापूर्वी 2024 च्या प्राथमिक मोटर रेसिंग स्पर्धा वेळापत्रकामध्ये हैदराबादला वगळण्यात आले होते. भारतामध्ये सर्व इलेक्ट्रिक सिरीजचे देशात पुनरागमन होत असल्याने फॉर्म्युला ई शर्यतीचेही पुढील वर्षीच्या हंगामात पुनरागमन होईल अशी आशा वाटत होती. दरम्यान 2024 च्या 10 फेब्रुवारी रोजी फॉर्म्युला ई मोटर शर्यत हैदराबादमध्ये घेतली जाणार आहे. एबीबी एफआयए फॉर्म्युला ई विश्व चॅम्पियनशिप आयोजकांतर्फे 2024 च्या रेसिंग हंगामामध्ये 10 शहरांची निवड केली असून त्यामध्ये हैदराबाद आणि शांघाय यांनाही यजमानपदाची संधी देण्यात आली आहे. शांघायमध्ये पहिल्यांदाच फॉर्म्युला ई शर्यत आयोजित केली असून 25 आणि 26 मे 2024 मध्ये ती घेतली जाणार आहे. यापूर्वी बिजिंगमध्ये पहिल्यांदा फॉर्म्युला ई मोटर रेसिंग शर्यत 13 सप्टेंबर 2014 मध्ये झाली होती.









