अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळल्यानंतर अटकेची कारवाई
प्रतिनिधी /फोंडा
बरकटे मोले येथे बेकायदेशीरित्या चिरेखाणीप्रकरणी फोंडा पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. माजी जिल्हा पंचायत सदस्य गोविंद कुष्टा गावकर (49, बकरटे मोले) असे त्याचे नाव आहे. संशयिताचा अटकपुर्व जामिन अर्ज मडगांव येथील सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर फोंडा पोलिसानी काल सोमवारी सायंकाळी गोविंद गावकर याला मोले येथून अटक केली.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बरकटे मोले येथील चिरे खाणीवर खाण खात्याने दि. 25 जुलै रोजी धाड टाकली होती. खाण खात्याचे अधिकारी जितेंद्र केळूसकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली होती. यावेळी घटनास्थळावरून 1 पावर टिलर, 3 मशिनच्या प्लेटस्, 2 जेसीबी व ट्रक जप्त करण्यात आला होते. चिरे खाणीचे बेकायदेशीररित्या उत्खननातून सरकारी मालमत्तेच्या सुमारे दीड कोटी रूपयाच्या मालमत्तेचा चोरीचा टपका संशयितावर ठेवण्यात आला आहे. तसेच अज्ञाताविरोधात तक्रार दाखल करण्याचे आदेश कुळे पोलिसांना दिले होते. त्यानंतर 33/1 सर्व्हे क्रमांकाच्या सखोल तपासाअंती याप्रकरणी संशयित गोविंद गावकर याला अटक करण्याचे आदेश देण्यात आले होते.
अटकेपासून बचावासाठी संशयिताने 30 जुलै रोजी अटकपुर्व जामिनासाठी मडगाव येथील सत्र न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर काल सोमवारी 8 ऑगस्ट रोजी सुनावणीनंतर संशयिताचा अटकपुर्व जामिनअर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करताना फोंडा पोलिस स्थानकाचे निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली काल सायंकाळी संशयित गोविंद गावकर याला मोले येथून अटक करण्यात आली. याप्रकरणी फोंडा पोलीस अधिक तपास करीत आहे.









