वृत्तसंस्था / नवी दिल्ली
विंडीजचे माजी अष्टपैलु क्रिकेटपटू तसेच 1975 साली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकणाऱ्या विंडीज संघातील खेळाडू बर्नार्ड ज्युलियन यांचे वयाच्या 75 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.
अष्टपैलु ज्युलियन यांनी 24 कसोटी आणि 12 वनडे सामन्यात विंडीजचे प्रतिनिधीत्व केले आहे. विंडीजचा संघ बलवान बनविण्यासाठी ज्युलियन यांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. आयसीसीतर्फे 1975 साली पहिल्यांदा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा इंग्लंडमध्ये घेण्यात आली होती. विंडीजने या स्पर्धेचे जेतेपद मिळविले होते. त्यानंतर विंडीजने सलग दुसऱ्यांदा 1979 साली विश्वचषक स्वत:कडे राखला होता. पण 1983 साली कपिल देवच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने विंडीजच्या लॉर्डस्वर अंतिम सामन्यात पराभव करत जेतेपदाला गवसणी घातली होती. त्यामुळे विंडीजचे विश्वचषक जिंकण्याची हॅटट्रीक हुकली होती.
1975 च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विंडीज संघाचे प्रतिनिधीत्व करताना ज्युलियनची अष्टपैलु कामगिरी महत्त्वाची ठरली होती. त्यांनी या स्पर्धेतील लंका विरुद्धच्या सामन्यात 20 धावांत 4 गडी बाद केले होते. तर न्यूझीलंडबरोबरच्या सामन्यात ज्युलियनने 27 धावांत 4 बळी मिळविले होते. त्यानंतर अंतिम सामन्यात 38 धावांत 2 गडी बाद करुन आपल्या संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. तसेच फलंदाजीत त्यांनी या अंतिम सामन्यात नाबाद 26 धावा जमविल्या होत्या.
ज्युलियन यांनी 24 कसोटी सामन्यात विंडीजचे प्रतिनिधीत्व करताना फलंदाजीत 30.92 धावांच्या सरासरीने 866 धावा तर गोलंदाजीत त्यांनी 37.36 धावांच्या सरासरीने 50 गडी बाद केले. वनडे क्रिकेटमध्ये ज्युलियन यांनी 12 सामन्यांत 25.72 धावांच्या सरासरीने 18 बळी मिळविले आहेत. ज्युलियन हे विंडीज संघातील डावखुरे वेगवान स्विंग गोलंदाज म्हणून ओळखले जात असतं. 1982-83 तसेच 1983-84 साली विंडीज संघाने द.आफ्रिकेचा दौरा केला होता. या दौऱ्यानंतर ज्युलियन यांनी क्रिकेट क्षेत्रातून निवृत्ती घेतली होती.









