प्रतिनिधी,विटा
Ajit Pawar News sangli : अखेरीस विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांचा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार गटातील प्रवेश निश्चित झाला आहे.कोल्हापूर येथील सभेसाठी जाणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सांगली जिल्ह्यात स्वागत करण्यासाठी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी वैभव पाटील गटाने केली आहे. केदारवाडी येथे उपमुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी टीम वैभव पाटील जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.तसे संदेश समाजमाध्यमावर पसरू लागले आहेत.
कोल्हापूर येथे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची उत्तरदायित्त्व सभा होत आहे.तिकडे जाण्यासाठी उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर अजित पवार पाहिल्यांदाच सांगली जिल्ह्यात येत आहेत. राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर दादा आणि साहेब यांच्याबरोबर कोण? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. त्यातही सांगली जिल्हा खुद्द प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा असल्याने दादांच्याबरोबर कोण जाणार? याबाबत उत्सुकता आहे. दादांच्या मुंबईतील सभेला अनेक मान्यवरांनी हजेरी लावल्याने राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मात्र माजी आमदार सदाशिव पाटील यांनी आपण वेळोवेळी थोरल्या साहेबांबरोबर असल्याचे जाहीर केले आहे.तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेऊन माजी आमदार पाटील यांनी चर्चा केल्याचेही समजते.त्यामुळे खानापूर तालुक्यातील राष्ट्रवादीत संशयकल्लोळ होता.मात्र, अखेरीस सर्व राजकीय संभ्रम दूर करीत वैभव पाटील यांनी अजित दादा गटात प्रवेश करीत त्यांच्या स्वागताला जाणार असल्याचे जाहीर केले आहे.
या पार्श्वभूमीवर खानापूर विधानसभा मतदारसंघात राजकीय खळखळ जाणवू लागली आहे.या मतदारसंघातील राष्ट्रवादीचे युवा नेते वैभव पाटील यांनी अजित दादा पवार गटाच्या मुंबईतील बैठकीस हजेरी लावली होती.त्यानंतर आता त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सांगली जिल्ह्यातील दौऱ्याच्या स्वागताची तयारी केली आहे.मतदारसंघातील वैभव पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी समाजमाध्यमावर आता ‘दादा पर्व’ असा संदेश पसरवत उपमुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी ‘चलो केदारवाडी’असा संदेश पसरवण्यास सुरूवात केली आहे.
त्यामुळे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात प्रवेश झाल्याचे स्पष्ट होत आहे.आता वैभव पाटील यांनीही अजित पवार यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी केली आहे.केदारवाडी येथे अजित पवार यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते घेऊन वैभव पाटील जाणार आहेत.त्यासाठीचे नियोजन त्यांनी केले आहे.त्यामुळे खानापूर मतदारसंघात आता नव्याने ‘दादा पर्व’ सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
अजितदादांच्या स्वागतासाठी जाणार
कोल्हापूर येथे होणाऱ्या उत्तरदायित्त्व सभेसाठी अजित दादा पवार येत आहेत. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचे पहिल्यांदाच सांगली जिल्ह्यात या निमीत्ताने आगमन होत आहे.मतदारसंघाच्या विकासासाठी दादांच्या नेतृत्त्वाची गरज आहे.त्यामुळे त्यांचे स्वागत मोठ्या प्रमाणात व्हावे,अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे.त्यासाठी आम्ही केदारवाडी येथे अजित दादांच्या स्वागताला जाणार आहे.
वैभव पाटील, माजी नगराध्यक्ष, विटा









