शुक्रवारी दुपारी बेळगावमध्ये आगमन, विविध कार्यक्रमांना उपस्थिती : पहलगाम प्रकरणी सरकारच्या भूमिकेचे समर्थन
बेळगाव : माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे दोन दिवसांच्या बेळगाव भेटीवर आले आहेत. शुक्रवारी दुपारी त्यांचे बेळगावमध्ये आगमन झाले. शनिवार दि. 26 रोजी येळ्ळूर येथे होणाऱ्या मराठी मॉडेल शाळेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार आहेत. शुक्रवारी आंबोली (सावंतवाडी) येथून त्यांचे बेळगावमध्ये आगमन झाले. दुपारी त्यांनी केएलईचे चेअरमन व माजी राज्यसभा सदस्य डॉ. प्रभाकर कोरे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी प्रभाकर कोरे व त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इंजिनिअर सेलच्या अध्यक्षा अमित देसाई यांच्या भांदूर गल्ली येथील घराला भेट दिली. यावेळी म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर अनेक विषय मांडले.
राजकारण बाजूला ठेवत दहशतवादाविरोधात लढा
पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले, पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला हा केवळ पर्यटकांवर नसून संपूर्ण देशवासियांवर झाला आहे. याची जबाबदारी आपण सर्वांची असून सर्वांनी एकत्रितरित्या काम करणे गरजेचे आहे. राजकारण बाजूला ठेवून पेंद्र सरकार आतंकवाद्यांविरोधात जी भूमिका घेईल त्या भूमिकेला आमचे समर्थन असेल, अशी भूमिका त्यांनी मांडली.
सीमालढ्यातील छायाचित्राने भावुक
अमित देसाई यांच्या घरी म. ए. समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भेट घेतली. यावेळी देसाई यांच्या कुटुंबीयांसोबत शरद पवार यांनी गप्पा मारल्या. यावेळी युवा म. ए. समितीने सीमाप्रश्नावर प्रकाशित केलेले पुस्तक भेट स्वरुपात त्यांना दिले. यावेळी त्या पुस्तकातील 1986 मध्ये कन्नड सक्ती आंदोलनात पोलीस अटक करतानाचा आपला फोटो पाहून शरद पवार भावुक झाले.









