कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत भाजपकडून उमेदवारीची ऑफर होती, असा गौप्यस्फोट राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केला आहे. मी सच्चा शिवसैनिक असल्याने ती ऑफर नाकारून महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले, असेही क्षीरसागर म्हणाले. क्षीरसागर यांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
कोल्हापूरच्या उत्तर पोटनिवडणुकीत ही जागा शिवसेनेला मिळावी, यासाठी माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचे प्रयत्न होते. मात्र सीटिंग फॉर्म्युला नुसार ही जागा काँग्रेसकडे गेली. कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे काहीकाळ शिवसेनेच्या गोटात नाराजी होती. मात्र खुद्द मुख्यमंत्र्यांनी नाराजी दूर करत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीच्या बाजूने राहण्याचे आदेश दिले होते. हा आदेश पाळत शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयासाठी जीवाचे रान केले. पण काल एका भेटी दरम्यान कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत भाजपकडून मला ऑफर होती, असा गौप्यस्फोट राजेश क्षीरसागर यांनी केला. त्यांच्या या विधानामुळे आता जिल्ह्यात चर्चा सुरु आहे.









