15 वर्षांनी परतले होते मायदेशी
वृत्तसंस्था/ बँकॉक
थायलंडच्या सर्वोच्च न्यायालयाने माजी पंतप्रधान थाकसिन शिनावात्रा यांना 8 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. थाकसिन शिनावात्रा हे विदेशात अनेक वर्षांच्या विजनवासानंतर मंगळवारीच मायदेशी परतले आहेत. थाकसिन हे स्वत:च्या कुटुंबीयांसोबत एका चार्टर्ड विमानाद्वारे थायलंडमध्ये पोहोचले होते.
थाकसिन यांना सत्तेच्या गैरवापराप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरविले आहे. याचबरोबर अवैध स्वरुपात एका शासकीय बँकेला कर्ज जारी करण्याचा आदेश दिल्याप्रकरणी ते दोषी ठरले आहेत. थाकसिन यांना मायदेशी परतताच सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयात नेण्यात आले होते.
थाकसिन शिनावात्रा यांना 2008 मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पदावरून हटविण्यात आले होते. तेव्हापासून ते देशाबाहेरच वास्तव्य करत होते. थाकसिन हे अनेक दशकांपासून थायलंडचे सर्वात प्रमुख राजकीय नेते राहिले आहेत. अनेक वर्षे देशाबाहेर राहूनही त्यांचा देशात मोठा प्रभाव आहे. थायलंडच्या ग्रामीण जनतेत थाकसिन यांचा मोठा प्रभाव आहे.









