पाकिस्तानमधील परिस्थिती बिघडल्याचा दावा
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ आपल्या पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज (पीएमएल-एन) पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी आणि जानेवारीमध्ये अपेक्षित असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत विक्रमी चौथ्यांदा सत्तेवर येण्यासाठी शनिवारी दुबईहून विशेष विमानाने मायदेशी परतले. ब्रिटनमधील चार वर्षांच्या स्व-निर्वासितानंतर ते पाकिस्तानात परतल्यानंतर त्यांचे कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. 73 वषीय शरीफ विशेष विमान ‘उमीद-ए-पाकिस्तान’ने दुबईहून इस्लामाबादला पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय, पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मित्रमंडळीही होती.
पाकिस्तानच्या दिशेने रवाना होण्यापूर्वी दुबई विमानतळावर, शरीफ यांनी देशातील सद्यस्थितीबद्दल पत्रकारांसमोर चिंता व्यक्त केली. देशातील परिस्थिती 2017 च्या तुलनेत खूपच खालावल्याचा दावा त्यांनी केला. परिस्थिती 2017 पेक्षा चांगली नाही… सद्यस्थिती पाहून मला वाईट वाटत असून आपला देश पुढे जाण्याऐवजी मागे गेला आहे. असे असतानाही आपण सत्तेत आल्यानंतर देशाच्या समस्या सोडविण्यास सक्षम आहोत, असेही ते पुढे म्हणाले.









