वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पाकिस्तानचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू बिली इबाद्दुल्ला यांचे शुक्रवारी वयाच्या 88 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. 1964 ते 1967 या कालावधीत इबाद्दुल्ला यांनी 4 कसोटी सामन्यात पाकचे प्रतिनिधीत्व केले होते.
1964 साली कराचीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध आपले कसोटी पदार्पण करताना इबाद्दुल्ला यांनी शतक झळकाविले होते. या कसोटीतील पहिल्या डावात त्यांनी 166 धावांची खेळी करताना अब्दुल कादिर समवेत सलामीच्या गड्यासाठी 249 धावांची भागिदारी केली होती. अब्दुल कादिरने याच सामन्यात आपले कसोटी पदार्पण केले होते. त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 27.28 धावांच्या सरासरीने 17,078 धावा जमविल्या असून गोलंदाजीत त्यांनी 30.96 धावांच्या सरासरीने 462 गडी बाद केले. पाक क्रिकेट मंडळातर्फे इबाद्दुल्ला यांना आदरांजली वाहण्यात आली.









