पुणे / प्रतिनिधी :
पुणे फेस्टिव्हलचे आमंत्रण महापालिका आयुक्तांना देण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे माजी खासदार सुरेश कलमाडी हे तब्बल दहा वर्षांनी महापालिकेत शुक्रवारी दाखल झाले. दरम्यान, आता नेहमी येत जाईन, अशी प्रतिक्रियाही यावेळी कलमाडी यांनी यावेळी दिली.
आयुक्तांची भेट घेण्यासाठी सुरेश कलमाडी महापालिकेत आले होते. खूप वर्षांनंतर पालिकेमध्ये आलात? असा प्रश्न यावेळी सुरेश कलमाडी यांना विचारण्यात आला. ‘यापुढे आता मी येतच राहील’, असे उत्तर कलमाडी यांनी दिले.
कॉमनवेल्थ घोटाळा उघडकीस आल्यानंतर सुरेश कलमाडी यांना काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमांना फारशी हजेरी लावली नव्हती. काही वर्षांपूर्वी त्यांनी भाजपाच्या नेत्यांसोबत गणपती विसर्जन मिरवणुकीला हजेरी लावली होती. त्यामुळे त्यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा सुरू होत्या.
राजकीय वर्तुळात चर्चा
पुण्यातील राजकारणात कधी काळी सुरेश कलमाडी यांचा मोठा दबदबा होता. मात्र, कॉमनवेल्थ घोटाळय़ानंतर ते अज्ञातवासात गेल्यासारखेच होते. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कलमाडी पुन्हा राजकारणात सक्रिय होत असलेल्याची चर्चा सुरु झाली आहे. पुणे काँग्रेसने आता आपला ‘सबसे बडा खिलाडी, सुरेश कलमाडी’ यांना मैदान उतरवण्याचे निश्चित केले आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
हेही वाचा : पुणे-सातारा रस्त्यावर सुरक्षाविषयक उपाययोजना करा, सुप्रिया सुळेंची गडकरींकडे मागणी