आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रक काडून कार्यकर्त्यांना केले शांतता राखण्याचे आवाहन
माजी खासदार किरीट सोमय्या ( Kirit Sommayya ) गुरुवारी दि. २३ कोल्हापूरमध्ये येत आहेत. कोल्हापुरात आल्यानंतर ते कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ( KDCC ) केंद्र कार्यालयाला भेट देणार असल्याचे वृत्तपत्रांमधील बातम्यांमधून समजले. केडीसीसी बँकेमध्ये त्यांचे स्वागतच आहे, असे पत्रक बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ ( Hasan Mushrif ) यांनी प्रसिद्धीला दिले आहे. सोमय्या यांच्या केडीसीसी बँकेच्या या भेटीच्या पार्श्वभूमीवर आमदार श्री. मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
या पत्रकात आमदार श्री. मुश्रीफ यांनी पुढे म्हंटले आहे, यापूर्वीच मी त्यांना आवाहन केले आहे की, तुम्ही बँकेत या आणि तुम्हाला जी- जी माहिती हवी असेल ती घ्या. कदाचित; त्यानुसार ते येत असावेत. दरम्यान; प्रशासकाची कारकीर्द संपल्यानंतर बँकेने गेल्या आठ वर्षात नेत्रदीपक अशी प्रगती केलेली आहे. विविध पक्षांचे प्रतिनिधी असलेले आम्ही संचालक मंडळ एकमताने आणि अतिशय विश्वासाने काम करीत आहोत. त्यामुळेच बँकेची यशस्वी वाटचाल होत आहे. या घडीला बँकेचा नेट एनपीए शून्य टक्के आहे. गेल्या ३१ डिसेंबर २०२२ अखेर बँकेला १०५ कोटी नफा झालेला आहे.









