प्रसिद्ध मल्याळी अभिनेते
वृत्तसंस्था/ कोची
मल्याळी अभिनेते आणि माजी लोकसभा खासदार इनोसेंट वरीद ठेक्केथाला यांचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले आहे. कोची येथील एका खासगी रुग्णालयात रविवारी रात्री उशिरा त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. 3 मार्च रोजी श्वसनावेळी त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच हृदयविकाराचा धक्का बसल्याने त्यांचे निधन झाल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.
इनोसेंट यांनी यापूर्वी कॅन्सरवर मात केली होती. ‘लाफ्टर इन द कॅन्सर वॉर्ड’या पुस्तकात त्यांनी कॅन्सर विरोधातील स्वतःच्या लढय़ाबद्दल लिहिले होते. इनोसेंट यांनी स्वतःच्या 5 दशकांहून अधिक काळाच्या कारकीर्दीत 700 हून अधिक मल्याळी चित्रपटांमध्ये काम केले होते. 2022 मध्ये पृथ्वीराज सुकुमारन यांचा चित्रपट क़डुवा’मध्ये ते अखेरचे दिसून आले होते.
इनोसेंट यांना मल्याळी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध कॉमेडियन म्हणून ओळखले जाते. इनोसेंट हे 1979 मध्ये इरिंजलक्कुडा येथे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तर चालकुडी लोकसभा मतदारसंघाचे त्यांनी माकप खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले होते.









