रत्नागिरी :
उद्धव ठाकरे सेनेचे नेते, सिंधुदुर्गतील माजी आमदार वैभव नाईक आणि त्यांची पत्नी स्नेहा नाईक हे दाम्पत्य मंगळवारी पुन्हा एकदा रत्नागिरीतील एसीबीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर होते. या दिवशी दुपारी 12 वाजल्यापासून सायंकाळी 6.30 पर्यंत चौकशी सुरू होती. यावेळी संपत्तीच्या चौकशीच्या अनुषंगाने नाईक दाम्पत्याकडून विविध कागदपत्रे सादर करून घेण्यात आली.
संपत्तीच्या सुरू असलेल्या चौकशीच्या अनुषंगाने एसीबीच्या अधिकाऱ्यांना यापूर्वीही वैभव नाईक व त्यांच्या पत्नीने माहिती दिली आहे. त्यानंतरही या चौकशीचा ससेमिरा अजूनही संपलेला नसल्याचे समोर येत आहे. वैभव नाईक यांनी या बाबत पत्रकाराशी बोलताना सांगितले की, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी ज्या फॉरमॅटमध्ये माहिती मागितली, ती देण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी वेगळ्dया पद्धतीने माहिती मागितली ते घेऊन आम्ही आलो आहोत.
रत्नागिरी एसीबी कार्यालयात नाईक दाम्पत्याची मंगळवारी दुपारी 12 वाजल्यापासून चौकशी सुरू झाली. सायंकाळी 6.30 वाजता ही चौकशी संपली. रत्नागिरीतील एसीबी कार्यालयामध्ये वैभव नाईक आणि त्यांची पत्नी यांची जवळपास साडेसहा तास चौकशी झाली. त्यांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी प्रतिक्रिया देताना सांगितले की, सध्या सुरू असलेली ही चौकशी त्रास देण्यासाठी असू शकते. ज्या लोकांच्या चौकशी सुरू आहेत आणि त्यांनी पक्षांतर केल्यानंतर त्यांची चौकशी थांबलेली आहे. दरम्यान मी टॅक्स यापूर्वीपासून भरत आहे आणि त्याची माहितीही मी दिली आहे. माझी पत्नीही या चौकशीला सामोरे जाईल, अशी प्रतिक्रिया वैभव नाईक यांनी रत्नागिरी येथील एसीबी कार्यालयात चौकशीसाठी आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिली. ही लढाई माझी मला एकट्याला लढायची आहे, अशीही प्रतिक्रिया वैभव नाईक यांनी यावेळी दिली.
मागच्या दोन वर्षांमध्ये तीनवेळा आतापर्यंत मी चौकशीसाठी हजर राहिलो. आमच्या चौकशीमध्ये माझा आणि माझ्या पत्नीचा इन्कम सोर्स, शिवाय खरेदी केलेल्या जागा यांची माहिती मागितली गेली. संपूर्ण माहिती मी त्यांना हव्या असलेल्या फॉरमॅटमध्ये दिली आहे. शिवाय त्यांनी आणखीन काही माहिती मागितली आहे, ती माहितीही त्यांना दिली जाईल. संपूर्ण चौकशीमध्ये पूर्ण सहकार्य केले जाईल, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी दिली.








