गारगोटी / अनिल कामीरकर
माजी आमदार व बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील कुणाला पाठींबा देणार याबाबत द्विधा मनस्थितीत असले तरी त्यांच्या बहुतांश कार्यकर्त्यांचे दबाव राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना पाठींबा द्यावा अशा स्वरूपाचा असून के पी पाटील यांचा निर्णय ही त्याच दिशेने होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी पक्षात उभी फुट पडल्याने के पी पाटील व जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून राहिले होते. मात्र, जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील यांनी अजित पवार यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला. वरुन दोघे ही एकत्र दिसत असली तरी दोघांच्यामध्ये राजकीय शीतयुद्ध सुरु आहेच.
आज हुतात्मा स्वामी वारके सुतगिरणीवर के पी यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. बैठकीला मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. मात्र अजित पवार यांच्या बरोबर जाण्याला बहुतांश कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला.के पी यांचे निकटचे मित्र मंत्री हसन मुश्रीफ यांनी अजित पवार यांचे समर्थन केल्याने के पी यांची मोठी गोची झाली असुन आगामी येणाऱ्या बिद्री साखर कारखाना व विधानसभेच्या दृष्टीने त्यांना सक्षम निर्णय घ्यावा लागणार आहे.
अजित पवार यांच्याशी ए.वाय पाटील यांचे घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे ए.वाय यांना झुकते माप पवार यांच्या कडून असणार आहे. शपथविधीच्या दुसऱ्या दिवशीच ए.वाय यांनी अजित पवार यांची मंत्री मुश्रीफ यांच्या बरोबर भेट घेतली होती. विधानसभेची तयारी ए.वाय पाटील यांच्याकडुन सुरू असुन अजित पवार यांना पाठींबा देण्यासाठी भुदरगड तालुक्यातील शंभर प्रमुख युवक कार्यकर्त्याची बैठक शुक्रवारी सोळांकूर येथे होत असुन त्याची जबाबदारी तालुक्यातील पुर्व भागातील एका युवक नेत्याकडे सोपवली आहे.
भुदरगड तालुक्यातील के पी पाटील यांचे कार्यकर्ते मात्र के पी यांनी शरद पवार यांना पाठींबा द्यावा याकरीता पाटील यांच्या वर दबाव टाकत असुन के पी पाटील ही द्वीधा मनस्थितीत आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचेशी के पी यांचे घनिष्ठ संबंध असल्याने निर्णयाला विलंब होत आहे.









