गायिका बलात्कार प्रकरणात दोषी, पुत्र-नातू पुराव्याअभावी निर्दोष
वृत्तसंस्था/ भदोही
उत्तर प्रदेशच्या भदोही खासदार-आमदार न्यायालयाने बाहुबली माजी आमदार विजय मिश्रा यांना 15 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. गायिका बलात्कार प्रकरणात ते दोषी आढळले होते. तुरुंगवासासोबतच त्यांना एक लाख 10 हजार रुंपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. याच प्रकरणात मिश्रा यांचा मुलगा विष्णू मिश्रा आणि नातू विकास मिश्रा यांनाही आरोपी करण्यात आले होते, मात्र न्यायालयाने ठोस पुराव्याअभावी दोघांचीही निर्दोष मुक्तता केली आहे.
2020 मध्ये वाराणसीमध्ये राहणाऱ्या एका गायिकेने मिश्रा यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात बाहुबली नेते विजय मिश्रा यांना भदोहीच्या खासदार-आमदार न्यायालयाने वाराणसीच्या गायिकेवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवल्यानंतर शनिवारी शिक्षेची घोषणा करण्यात आली. या खटल्याची सुनावणी तीन वर्षांपासून न्यायालयात सुरू होती. विजय मिश्रा नातेवाईकाची मालमत्ता हडप केल्याप्रकरणी तुऊंगात आहेत. आता या बलात्कार प्रकरणात न्यायालयाने मिश्रा यांना 15 वर्षांची शिक्षा आणि आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली आहे. बलात्कार प्रकरणी न्यायालयाने विजय मिश्रा यांना शुक्रवारी दोषी घोषित केले होते. शिक्षेसाठी शनिवार निश्चित करण्यात आला होता. शनिवारी सकाळी 11 वाजता न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू होण्यापूर्वी मिश्रा यांना 10 वाजता कडक सुरक्षा व्यवस्थेत न्यायालयात नेण्यात आले. न्यायालयाबाहेरही पुरेशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.









