मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो व्हायरल : राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
प्रतिनिधी/कोल्हापूर
मुंबई येथील बीकेसी मैदानावर बुधवारी झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या दसरा मेळाव्याला करवीरचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी उपस्थिती लावली. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबतचा नरके यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांच्यासोबत आमदार प्रकाश आबिटकर उपस्थित आहेत. नरके यांनी अद्यापही भुमिका जाहीर केलेली नाही. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबतचा फोटो व्हायरल झाल्यानंतर नरके हे शिंदे गटासोबत गेल्याच्या चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.
मध्यंतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोनवेळा कोल्हापूर दौऱ्यावर आले तेंव्हा माजी आमदार नरके हेदेखील विमानतळावर उपस्थित राहिले. यादरम्यान ठाकरे गटातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याबद्दल ‘मातोश्री’वर तक्रार केली होती. त्याचवेळी जिल्ह्य़ाच्या राजकीय वर्तुळातही नरके शिंदे गटासोबत गेल्याची चर्चा रंगली होती. मात्र नरके यांनी केवळ भेटीसाठी गेल्याचे सांगत उघड भुमिका घेणे टाळले होते. बंडानंतर नरके दोन्ही गटातही सक्रीय दिसलेले नाहीत, त्यामुळे त्यांची भुमिका गुलदस्त्यात राहिली आहे.
हे ही वाचा : ‘धनुष्यबाण’ चिन्ह आम्हाला द्या, अन्यथा गोठवा; शिंदेंची निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे मागणी
शिवतीर्थ आणि बीकेसी मैदानावर झालेल्या दसरा मेळाव्याला दोन्ही गटाच्या समर्थकांनी प्रचंड गर्दी केली. यामध्ये माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या मेळाव्याला उपस्थिती लावली. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत मेळाव्यामध्ये घेतलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे माजी आमदार नरके शिंदे गटासोबत गेल्याची चर्चा रंगली आहे.
करवीरच्या राजकारणाची समीकरणे
आगामी विधानसभा निवडणूक डोळय़ासमोर ठेवून नरके शिंदे गटासोबत जाण्याची शक्यता आहे. लवकरच ते त्यांची भुमिका उघडपणे जाहीर करण्याचीही शक्यता आहे. करवीर विधानसभा मतदारसंघातून सध्या काँग्रेसचे नेते पी. एन. पाटील आमदार आहेत. पुढील काळात महाविकास आघाडी म्हणून विधानसभेची निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेने एकत्रित लढल्यास नरके यांची अडचण होणार आहे. तर या मतदारसंघात भाजप आणि जनसुराज्यकडे तुल्यबळ उमेदवार नसल्याने शिंदे गटासोबत गेल्यास त्यांना निवडणुक लढता येणार आहे. तसेच भाजपसह जनसुराज्यची शक्तीही सोबत मिळणार आहे. ही राजकीय समीकरणे पाहता आणि बीकेसी मैदानावरील उपस्थिती यावरुन नरके हे शिंदे गटासोबतच जाणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.









