केपे : कुडचडे येथील नामवंत सेवाभावी डॉक्टर तथा माजी आमदार, मगो पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते अनिल हरी प्रभुदेसाई यांचे अल्प आजाराने काल रविवारी सायंकाळी दु:खद निधन झाले. आज सोमवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अनिल हरी प्रभुदेसाई हे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते व आमदार होते. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी त्यांचे शिक्षण, स्वभाव, व सामाजिक कार्य पाहून त्यांना पणजीत बोलावून घेऊन विधानसभेची कुडचडे मतदारसंघाची उमेदवारी बहाल केली होती. 1972 साली कुडचडे मतदारसंघातून ते मगो पक्षाच्या उमेदवारीवर निवडून आले होते. त्यांनी युनायटेड गोवन्स (सिक्वेरा गट)चे उमेदवार गोपिनाथ करमली यांचा पराभव केला होता.
कुडचडे मतदारसंघाच्या विकासात त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले होते. युवकांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी ते झटत होते. अनेक युवकांना त्यांनी सरकारी तसेच खासजी नोकऱ्या मिळवून दिल्या होत्या. कुडचडेतील दयानंद कला केद्रांचे ते संस्थापक सदस्य होते. बांदोडकरांनी त्यांना दुसऱ्या खेपेसही उमेदवारी दिली होती. परंतु आपल्या डॉक्टरी सेवेवर विपरित परिणाम होत असल्याने आपण निवडणूक लढवत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बांदोडकरांनीही त्यांच्या मताचा आणि कार्याचा आदर राखला आणि त्यांचा गौरव केला होता. डॉक्टर म्हणून त्यांनी रूग्णांना चांगली सेवा दिली होती. ते कुडचड्यातच नव्हे, तर सांगे, केपे, काणकोण तालुक्यांतही प्रसिद्ध होते. ते नेहमीच गरीब व गरजू लोकांना मोफत वैद्यकीय सेवा द्यायचे. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र दु:ख व्यक्त केले जात आहे. आज सोमवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.









