जादू ही नेहमी बाळासाहेब ठाकरे यांची असते. बाळासाहेब यांच्या जादूपासून दूर गेलं की काय होतं हे पाहीले आहेच. कालचा जो मेळावा झाला त्याच्या जाहिरातीवरून बाळासाहेबांचे नाव गायब होते. त्यामुळे दोन्ही काँग्रेसचा प्रयत्न राहिला आहे की बाळासाहेब ठाकरे यांची जादू नाहीशी करायची असल्याचे मत राज्याचे शालेय शिक्षणमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री दिपक केसरकर यांनी व्यक्त केले.
त्यांनी आज कोल्हापूरातील श्रीक्षेत्र वाडी रत्नागिरी येथिल श्री जोतिबाचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेवर टिका केली. ” यापुर्वी सुद्धा दोन्ही कॉग्रेसने बाळासाहेबांची जादू कशी नाहीशी करायची याचा नेहमीच प्रय़त्न केला आहे. पण त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही कारण शिंदे साहेब यांनी उठाव केला आणि बाळासाहेब यांचं नाव कायम ठेवलं”
पुढे बोलातना त्यांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला, “बाळासाहेबांच्या विचारापासून दुर गेल्यावर काय होते हे आपण पाहीले आहेच. शिंदेंनी उठाव केला नसता तर फक्त उबाठा हेच नाव राहिलं असतं शिवसेनेचं. आता उद्धव ठाकरेंकडे केवळ उबाठा हे नाव राहिले आहे. अजूनही उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर, सावरकरांच्या, बाळासाहेब यांच्या विचाराबरोबर यावं. स्टेजवरून इशारे न देता सावरकर यांच्यावर टिका करणाऱ्या काँग्रेसपासून दूर जाऊन उत्तर द्यावं” असे आवाहन त्यांनी उद्धव ठाकरे यांना केले.
आपल्या दौऱ्यात जोतिबाचे दर्शन घेतल्यावर त्यांनी “जोतिबाचा आशीर्वाद नेहमीच कोल्हापूरवर राहिला आहे. आज जोतिबाच्या पालखीची पूजा करून पंचगंगा नदी शुद्धीकरण बैठकीला उपस्थित राहणार आहे. कोल्हापूरला आंतरराष्ट्रीय पर्यटन नगरी बनवायची आहे” असे मत त्यांनी वक्त केले.