चंदीगड : पंजाबमधील दक्षता विभागाच्या अधिकाऱयाला लाच देण्याप्रकरणी माजी मंत्री सुंदर शायम अरोडा यांना अटक करण्यात आली आहे. उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता जमविल्याप्रकरणी अरोडा यांनी दक्षता अधिकाऱयाला 1 कोटी लाच देण्याची तयारी दर्शविली होती. 50 लाख रुपये घेऊन चंदीडगमध्ये पोहोचल्यावर त्यांना अटक करण्यात आली आहे. अरोडा हे पूर्वी काँग्रेसमध्ये होते. कॅप्टन अमरिंदर सिंह मुख्यमंत्री असताना ते राज्याचे मंत्री होते. कॅप्टन यांना मुख्यमंत्री पदावरून हटविल्यावर अरोडा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पंजाबमधील दक्षता विभागाने माजी मंत्री अरोडा यांच्याविरोधात एका अतिरिक्त महानिरीक्षकाला 50 लाख रुपयांची लाच दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. अरोडा यांनी 14 ऑक्टोबर रोजी आपली भेट घेत चौकशीदरम्यान फेरफार करण्यासाठी 1 कोटी रुपयांची लाच देण्याची ऑफर दिली होती अशी तक्रार अतिरिक्त महानिरीक्षक मनमोहन कुमार यांनी केली होती. अरोडा यांनी 15 ऑक्टोबर रोजी 50 लाख तर उर्वरित रक्कम पुढील काळात देणार असल्याचे सांगितले होते. याचप्रकरणी अरोडा यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 50 लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत.
अटकेची कारवाई केल्यावर दक्षता विभागाच्या पथकाने त्यांच्या होशियारपूर येथील निवासस्थानात झडती घेतली आहे. तर अरोडा यांच्या कुटुंबीयांनी पंजाब सरकार विनाकारण त्रास असल्याचा आरोप केला आहे.









