मुरगूड / वार्ताहर
येथील मंडलिक गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते, माजी नगराध्यक्ष, पैलवान पांडूरंग कृष्णा भाट (वय- ६७ ) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. दिवगंत खासदार सदाशिवराव मंडलिक, खास. संजय मंडलिक गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून पैलवान पांडूरंग भाट यांची तालुक्यात ओळख आहे. कुस्तीमध्ये त्यांनी शालेय स्तरावर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते. जयशिवराय तालीमचे त्यांनी वस्ताद म्हणून अनेक वर्षे काम पाहिले व अनेक राष्ट्रीय स्तरावरील मल्ल तयार केले. येथील नामवंत राणाप्रताप क्रीडा मंडळाचे ते आधारस्तंभ होते.
दिवगंत खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली मुरगूड नगरपरिषदेत १७ डिसेंबर १९९७ ते १६ डिसेंबर १९९८ या कालावधीत त्यांनी नगराध्यक्षपद भूषविले आहे. सध्या ते येथील राजर्षी शाहु सहकारी पतसंस्थेत संचालक म्हणूनही काम पहात होते. त्यांच्या अचानक जाण्याने राजकीय सामाजिक व कुस्ती क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. ते दुधगंगा बचाव कृती समितीच्या आंदोलनातील सक्रिय सहभागी होते.









