ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मुंबईचे माजी महापौर आणि ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते विश्वनाथ महाडेश्वर यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 63 वर्षांचे होते. दुपारी 2 वाजता त्यांचे पार्थिव सांताकृझ पूर्व येथील राजे संभाजी विद्यालयात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर दुपारी 4 वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.
महाडेश्वर मागील आठवडय़ात कणकवली या आपल्या गावी गेले होते. चार दिवसांपूर्वीच ते मुंबईत परतले होते. काल रात्री त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना व्हि एन देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
2017 ते 2019 या काळात महाडेश्वर मुंबईचे महापौर होते. त्यांनी स्थायी समितीचे आणि शिक्षण समितीचेही अध्यक्षपदही भूषवलं होतं. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पूर्व मतदारसंघातून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. महाडेश्वर यांच्या निधनाने ठाकरे गटाचं मोठं नुकसान झालं आहे.








