वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
माजी आयएएस अधिकारी कन्नन गोपीनाथन यांनी सोमवारी काँग्रेसमध्ये प्रवेश sकला आहे. काँग्रेसचे संघटन महासचिव के.सी. वेणुगोपाल आणि पक्षाचे वरिष्ठ नेते पवन खेडा यांनी गोपीनाथन यांना पक्षाचे सदस्यत्व प्रदान केले आहे. कन्नन गोपीनाथन यांनी जम्मू-काश्मीरच्या लोकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य न देणे आणि अनुच्छेद 370 हटविण्याच्या मुद्द्यावरून स्वत:च्या पदाचा राजीनामा दिला होता. केरळचे रहिवासी असलेले कन्नन हे राजीनामा देण्यापूर्वी पेंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेलीमध्ये तैनात होते. ते 2012 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी राहिले आहेत.
2019 मध्ये आयएएस अधिकारी म्हणून राजीनामा दिला होता. सरकार देशाला ज्या दिशेने नेऊ पाहत आहे ती योग्य नाही हे त्यावेळी स्पष्ट होते. चुकीच्या विरोधात लढायचे हे मी ठरविले होते. मी 80-90 जिल्ह्यांचा दौरा केला आणि लोकांशी संवाद साधला, अनेक नेत्यांना भेटलो. त्यानंतर केवळ काँग्रेस पक्षच देशाला योग्य दिशा दाखवू शकतो हे माझ्यासमोर स्पष्ट झाल्याचा दावा गोपीनाथन यांनी केला.
अनुच्छेद 370 हटविणे सरकारचा निर्णय असू शकतो. परंतु तुम्ही पूर्ण राज्याला बंद कराल, सर्व पत्रकार, खासदार, माजी मुख्यमंत्र्यांना तुरुंगात डांबाल, परिवहन, दूरसंचार, इंटरनेट बंद कराल, तर ते योग्य नाही. हा केवळ माझ्यासाठी नव्हे तर आम्हा सर्वांसाठी एक प्रश्न आहे. एका लोकशाहीवादी देशात हे योग्य असू शकते का? याच्या विरोधात मी आवाज उठविला होता आणि यावर मी आजही ठाम असल्याचे गोपीनाथन यांनी म्हटले आहे.









