वयाच्या 86 व्या वर्षी गुरुग्राम येथील निवासस्थानी अखेरचा श्वास
वृत्तसंस्था/ गुरुग्राम
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांनी शुक्रवारी वयाच्या 89 व्या वर्षी त्यांच्या गुरुग्राम येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी सकाळी 11.30 वाजता त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात आणण्यात आले, मात्र तोपर्यंत हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला होता. अनेक दिवसांपासून ते वृद्धापकालीन आजारांचा सामना करत होते. ते हरियाणाचे 5 वेळा मुख्यमंत्री झालेले नेते होते.
ओमप्रकाश चौटाला हे अनेक दिवसांपासून आजारी होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चौटाला यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मान्यवर नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. ‘ओम प्रकाश चौटालाजी यांच्या निधनाने मला अत्यंत दु:ख झाले आहे. ते वर्षानुवर्षे राज्याच्या राजकारणात सक्रिय राहिले आणि चौधरी देवीलाल जी यांचे कार्य पुढे नेण्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले. त्यांच्या कुटुंबाप्रती मी शोक व्यक्त करतो’, असे ट्विट पंतप्रधानांनी केले आहे.
ओम प्रकाश चौटाला हे भारताचे माजी उपपंतप्रधान देवी लाल यांचे ज्येष्ठ पुत्र होते. त्यांचा जन्म 1 जानेवारी 1935 रोजी सिरसा येथे झाला होता. 2012 मध्ये जेबीटी भरती घोटाळ्यात ते दोषी आढळल्यानंतर 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. या शिक्षेदरम्यान चौटाला यांनी तुरुंगातूनच दहावीची परीक्षा दिली होती. वयाच्या 86 व्या वर्षी इंग्रजीचा पुरवणी पेपर सोडवून ते प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले होते. मे 2022 मध्ये वयाच्या 87 व्या वर्षी चौटाला यांनी 10वी आणि 12वी उत्तीर्ण होत ‘अभ्यासासाठी वय नसते’ हे सिद्ध केले होते.
ओ. पी. चौटाला यांचे वडील चौधरी देवी लाल हे हरियाणाचे मुख्यमंत्री आणि देशाचे उपपंतप्रधान होते. घरात राजकारणाचे वातावरण असल्याने त्यांच्या भावी आयुष्याची वाटचाल आधीच ठरवलेली होती. त्यांनी आपले शिक्षण अर्धवट सोडून वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला होता. हरियाणातील प्रमुख नेत्यांमध्ये ओम प्रकाश चौटाला यांच्या नावाचा समावेश होता. वडिलांप्रमाणे ते हरियाणाचे मुख्यमंत्री राहिले. ते 7 वेळा आमदार आणि 5 वेळा हरियाणाचे मुख्यमंत्री झाले. सध्या ते हरियाणातील प्रादेशिक पक्ष इंडियन नॅशनल लोक दलाचे (आयएनएलडी) राष्ट्रीय अध्यक्ष होते. मुख्यमंत्रिपदाच्या काळात त्यांना 5 वर्षांचा कार्यकाळ एकदाच पूर्ण करता आला. चौटाला यांच्या आयएनएलडीने 2000 साली पूर्ण बहुमताने स्थापन केलेले सरकार 5 वर्षे टिकले होते.
तिहार तुरुंगातून दिली दहावीची परीक्षा
ओम प्रकाश चौटाला यांनी 2021 साली वयाच्या 86 व्या वर्षी दहावीची इंग्रजी परीक्षा दिली होती. हरियाणा शालेय शिक्षण मंडळाची ही परीक्षा सिरसा येथील एका केंद्रावर झाली. हरियाणा शिक्षण मंडळाने 5 ऑगस्ट 2021 रोजी चौटाला यांचा 12वीचा निकाल रोखून धरला होता. कारण त्यांनी दहावीचा इंग्रजीचा पेपर दिला नव्हता. सिरसा शाळेची दहावीची विद्यार्थिनी मलकित कौर हिने चौटाला यांच्यासाठी लेखनिक म्हणून काम केले होते. सुरुवातीला त्यांनी 2019 मध्ये तुरुंगातून दहावीची परीक्षा दिली होती, मात्र त्यांना इंग्रजीचा पेपर लिहिता आला नाही. वयाच्या 86 व्या वर्षी, त्यांनी ऑगस्ट 2021 मध्ये पुरवणी परीक्षेअंतर्गत इंग्रजीची परीक्षा दिली आणि मे 2022 मध्ये जाहीर झालेल्या निकालात त्यांना 88 टक्के गुण मिळाले. दहावीची इंग्रजी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर बोर्डाने बारावीचा प्रलंबित निकाल देखील जाहीर केला होता.









