वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशाचे माजी परराष्ट्रमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कुंवर नटवर सिंह यांचे वयाच्या 95 व्या वषी निधन झाले. वृद्धापकालीन आजारांमुळे अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याचदरम्यान उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. नटवर सिंह हे निवृत्त आयएफएस (भारतीय परराष्ट्र सेवा) अधिकारी देखील होते. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
नटवर सिंह यांचा जन्म 16 मे 1929 रोजी राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील जगिना गावात भरतपूरच्या शासक घराण्यातील जाट हिंदू कुटुंबात झाला. अजमेर येथील मेयो कॉलेज आणि सिंधिया स्कूल, ग्वाल्हेर येथे शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून ग्रॅज्युएशनची पदवी घेतली. यानंतर ते पुढील उच्च शिक्षणासाठी केंब्रिजला गेले. येथे त्यांनी कॉर्पस क्रिस्टी कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण केले आणि चीनमधील विद्यापीठात काही काळ व्हिजिटिंग स्कॉलरही होते. याचदरम्यान त्यांची भारतीय परराष्ट्र सेवेसाठी निवड झाली. सेवेच्या काळात त्यांनी चीन, न्यूयॉर्क, पोलंड, इंग्लंड, पाकिस्तान, जमैका, झांबियासह अनेक देशांमध्ये काम केले.
राजकीय जीवनाची सुऊवात
1984 मध्ये आयएफएस सेवेचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत राजकीय कारकिर्दीला सुऊवात केली. त्याचवषी नटवर सिंह यांनी भरतपूरमधून लोकसभा निवडणूक लढवली आणि विजयी झाल्यानंतर ते राज्यमंत्री झाले. त्यांच्याकडे पोलाद, कोळसा, खाणी आणि कृषी खात्यांची जबाबदारी देण्यात आली होती. 1984 मध्ये त्यांना पद्मभूषण हा भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला होता. यानंतर 1986 मध्ये नटवर सिंह परराष्ट्र राज्यमंत्री बनले. 1987 मध्ये त्यांची न्यूयॉर्क येथे झालेल्या नि:शस्त्रीकरण आणि विकासावरील संयुक्त राष्ट्र (युएन) परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. 1989 च्या सार्वत्रिक निवडणुकीत नटवर सिंह यांनी उत्तर प्रदेशातील मथुरा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना येथे पराभवाला सामोरे जावे लागले होते.









