38 दुध उत्पादकांची सहकार निबंधकाकडे लेखी तक्रार : नोडल अधिकाऱ्याने दिले दोषींची चौकशी करण्याचे आदेश
प्रतिनिधी / फेंड़ा
गोवा डेअरीच्या तत्कालीन संचालकांनी वैयक्तिक फायद्यासाठी गोवा स्टेट कॉ ऑप बॅक फोंडा शाखेतून सुमारे 8 कोटी रूपये कोणत्याही आमसभा व संचालक मंडळाच्या बैठकीत परवानगीशिवाय पंजाब महाराष्ट्र कॉ ऑप बॅकेत हस्तांतरीत केल्याचा आरोप 38 दुध उत्पदकांनी केला आहे. सदरप्रकरणी लेखी तक्रार सहकार निबंधकाकडे करत सर्व जबाबदार संचालकांकडून नुकसान व व्याजासह भरपाई करावी अशी मागणी केली आहे.
तत्कालीन संचालकाच्या या कृतीमुळे सहकार कायद्याच्या कलम 59 व उपकलम 9 अन्वये विश्वासाचा भंग केल्याप्रमाणे गोवा डेअरीच्या वित्त व्यवस्थापकामुळे मोठे नुकसान झालेले असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. गोवा डेअरीच्या पायाभूत सुविधा, सहकारी संस्थांना सहकार्य व उत्कर्षासाठी वापरण्याचा निधी परस्पर दुसरीकडे वळविल्यामुळे गोवा डेअरीच्या दुध उत्पादकांचे भवितव्य अंधारात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे याप्रकरणी तातडीने चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. सरकारने घालून दिलेल्या सर्व अटी व शर्थी याची माहिती असतानाही डेअरीच्या मुख्य लेखापाल असलेल्या राधिका काळेही याप्रकरणी तेवढयाच जबाबदार असल्याचा या तक्रारीत म्हटले आहे.
एनपीडीडी कडून मिळवले रू 8 कोटी … दुध उत्पादकाचे हात रिकामे
गोवा सहकारी दुध उत्पादक संघाला एनपीडीडी कडून रू. 16 कोटीचा निधी मंजूर झाला होता. त्यानुसार पहिला हप्ता सुमारे 8 कोटी रूपये गोवा डेअरीच्या गोवा स्टेट बॅक ऑफ इंडियाच्या खात्यात जमा करण्यात असा मंजूरी अधिकाऱ्याने कळविले होते. मात्र अटी व शर्तीनुसार सदर रक्कम ही डेअरीच्या उत्कर्षासाठी वापरणे बंधनकारक असते. ती कायम ठेवीच्या रूपात व्याज मिळवण्यासाठी वापरता येत नाही. ती ज्या कारणासाठी दिली गेली होती त्यासाठी खर्च करणे बंधनकारक होती. मंजूरी प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय अन्य बॅकेत हस्तांतरीत करता येत नाही. म्हणून गोवा दुध संघाच्य वित्त विभागाने मंजूर प्राधिकरणाकडे सादर केलेल्या वापर प्रमाणपत्राची तपासणी करणे गोवा दुध उत्पादक संघाने घालून दिलेल्या किंवा अटी तपासणे गरजेचे असल्याची मागणी दुध उत्पादकांनी केली आहे.
गोवा स्टेटमधून दुसऱ्या कॉ ऑप बॅकेत कुणाच्या फायद्यासाठी वळविली
गोवा स्टेट कॉ ऑप बॅक फोंडा शाखेत ठेवण्यात आलेली रक्कम कोणत्याही बॅकेत हस्तांतरीत करण्यासाठी संचालक मंडळाचा योग्य ठराव घेतला नसल्याचा असा संशय व्यत करताना निधी हस्तांतरीत करण्यापुर्वी सरकारची मंजूरी घेण्यात आलेली नसल्याचे आढळून आलेले आहे. त्यामुळे मोठ्या निधीच्या हस्तांतरणाचे मुळे कारण कोणते? कोणाच्या फायद्यासाठी एवढी मोठी रक्कम वळविण्यात आली याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. पंजाब महाराष्ट्र बॅक डबघाईस आल्यामुळे सदर रक्कम परत मिळण्याची शक्यता अंत्यत अंधूक असून याला जबाबदार सर्व संचालकांची चौकशी व्हावी व रक्कम वसुल करून घ्यावी अशी मागणी दुध उत्पादकांनी केली आहे. त्यानंतर स्थापन झालेल्या संचालक मंडळानेही या वसुलीबाबत मौन बाळगलेले आहे यामुळे संशयाला वाव आहे. मंजूरी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यानी भारत सरकारच्या गोवा दुध संघाला भेट दिल्यानंतर या प्रकल्पासाठी नोडल अधिकाऱ्याने यासंबंधी गुंतलेल्या व जबाबदार असणाऱ्याविरोधात कारवाईचे निर्देश जारी केले आहे.








