खेड :
खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख व चिरणी गावचे सुपुत्र मोहन आंब्रे (65) यांचा मंगळवारी रात्रीच्या सुमारास अपघाती मृत्यू झाला. तालुक्यातील चिरणीनजीकच्या पुलाजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. कोल्हापूर येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अकाली निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
मूळचे चिरणी येथील रहिवासी असलेले मोहन आंब्रे लोटे येथे वास्तव्यास होते. मंगळवारी दुपारच्या सुमारास दुचाकीने चिरणी येथून लोटे येथील नि वासस्थानी येत असताना चिरणी पुलाजवळ समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराने धडक दिली. या अपघातानंतर ते कमानीवर आदळल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी चिपळूण लाईफकेअरमध्ये दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर बनल्याने रत्नागिरी येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अधिक उपचारासाठी अन्यत्र हलवण्याचा सल्ला दिल्यानंतर कोल्हापूर येथील एका खासगी रुग्णालयात त्यांना हलवण्यात आले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासले असता रात्रीच्या सुमारास मृत घोषित केले. त्यांच्यावर बुधवारी दुपारच्या सुमारास चिरणी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी राजकीय, सामाजिक, उद्योग, सहकार, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांसह स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी हितचिंतक व ग्रामस्थ उपस्थित होते.
मोहन आंब्रे हे शिवसेनेच्या जुन्या पिढीतील कडवट कार्यकर्त्यांपैकी एक होते. तालुकाप्रमुखपदाच्या माध्यमातून संघटना बळकटीसाठी त्यांचे विशेष योगदान होते. त्यांचा लोकसंपर्कही दांडगा होता. पंचायत समिती उपसभापतीपदाच्या माध्यमातून विकासकामांना चालना देत त्यांनी सर्वसामान्य जनतेमध्ये मानाचे स्थान मिळवले होते. राजकीय, सामाजिक क्षेत्रातही त्यांचा दबदबा होता. त्यांच्या अकाली निधनाने सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे.








