दक्षिण कोरियातील घटना : अधिकाऱ्यांनी वाचविले
वृत्तसंस्था/ सोल
दक्षिण कोरियाचे माजी संरक्षणमंत्री किम योंग ह्यून यांनी मार्शल लॉ लागू करण्यासंबंधी अटक झाल्यावर आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. किम यांनी सोलच्या डिटेक्शन सेंटरमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तुरुंग अधिकाऱ्यांनी त्यांना आत्महत्येचा प्रयत्न करताना पाहिल्यावर वाचविले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती कोरियाच्या करेक्शनल सर्व्हिसचे आयुक्त जनरल शिन योंग यांनी दिली आहे.
न्याय मंत्री पार्क सुंग यांनीही किम यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नाची पुष्टी दिली आहे. किम यांच्यावर विरोधी पक्षांकडून महाभियोग चालविण्याची तयारी केली जात असताना हा प्रकार घडला आहे.
किम यांना बंड आणि सत्तेच्या गैरवापराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. 3 डिसेंबर रोजी मार्शल लॉ लागू केल्याप्रकरणी अटक होणारे ते पहिले आरोपी ठरले होते. मार्शल लॉदरम्यान सुरक्षा दलांना संसदेत तैनात करण्याचा आरोप त्यांच्यावर आहे. संसदेला शस्त्रसज्ज सैनिकांनी घेरले होते. तत्कालीन संरक्षण मंत्र्यांच्या आदेशावर ही तैनात करण्यात आली होती असे सैन्य कमांडर्सनी सांगितले हेते. संसदेने सर्वसंमतीने मार्शल लॉचा आदेश फेटाळला होता. यानंतर मंत्रिमंडळाला हा आदेश 4 डिसेंबर रोजी मागे घ्यावा लागला होता. याप्रकरणी आता चौकशी आणि अटकसत्र सुरू आहे.
सोल येथील न्यायालयाने किम यांच्या विरोधात वॉरंट जारी केले होते. ज्यानंतर त्यांना मागील आठवड्यात अटक करण्यात आली होती. मार्शल लॉ लागू करण्याप्रकरणी अध्यक्ष यून सुक येओल आणि अन्य अधिकाऱ्यांसोबत संगनमत केल्याचा आरोप किम यांच्यावर आहे. किम यांच्या कृत्याला बंड मानले जावे की नाही याबद्दल सध्या चौकशी केली जात आहे. बंडाचा आरोप सिद्ध झाल्यास मृत्युदंड ठोठावला जाऊ शकतो. दक्षिण कोरियात 40 वर्षांमध्ये पहिल्यांदाच 3 डिसेंबर रोजी मार्शल लॉ लागू करण्यात आला होता. परंतु हा केवळ 6 तासच लागू राहू शकला होता.









