वृत्तसंस्था / नवी दिल्ली
इंग्लंडचे माजी वेगवान गोलंदाज तसेच माजी गोलंदाज प्रशिक्षक पीटर लिव्हर यांचे वयाच्या 84 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. इंग्लंडच्या क्रिकेट क्षेत्रामध्ये पीटर लिव्हर यांचे योगदान महत्त्वाचे असल्याने गेल्यावर्षी त्यांचा लँकेशायर हॉल ऑफ फेममध्ये समावेश करुन गौरव करण्यात आला होता.
1960 ते 1970 या दशकामध्ये पीटर लिव्हर यांनी इंग्लीश कौन्टी क्रिकेटमध्ये लँकेशायर संघाचे प्रतिनिधीत्व करताना जवळपास 1000 गडी बाद केले आहेत. त्यांनी 17 कसोटी आणि 10 वनडे सामन्यात इंग्लंडचे प्रतिनिधीत्व केले आहेत. वयाच्या 30 व्या वर्षी पीटर लिव्हर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले अधिकृत पदार्पण केले. 1970-71 च्या अॅशेस मालिकेत पीटर लिव्हर यांनी 5 कसोटीत 13 गडी बाद केले. इंग्लंडने ही अॅशेस मालिका 2-0 अशी जिंकली होती. 1976 च्या आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उपांत्यफेरी गाठणाऱ्या इंग्लंड संघामध्ये पीटर लिव्हर यांचा समावेश होता. 1976 साली पीटर लिव्हर यांनी निवृत्तीचा निर्णय घेतला. त्यांनी 17 कसोटीत 36.80 धावांच्या सरासरीने 41 बळी मिळविले. तसेच 10 वनडे सामन्यात त्यांनी 11 गडी बाद केले आहेत. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळातर्फे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.









