ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुणे महानगरपालिकेच्या नगरसेवकांची मुदत 14 मार्चला संपली आहे. त्यांना आता महापालिका निवडणुकांचे वेध लागले असून, त्यांची चमकोगिरी वाढली आहे. पुण्यातील भाजपच्या एका माजी नगरसेविकेने चक्क महात्मा फुलेंच्या वाडय़ावर सासूबाईंच्या नावाने फलक लावले. फुले वाडय़ातील प्रवेशद्वारावर ज्योतीबा फुले यांच्या नावापेक्षा मोठं नाव माजी नगरसेविकेच्या सासूबाईंचं नाव असल्याने समता परिषदेचे कार्यकर्ते भडकले होते. महात्मा फुले मोठे की नगरसेविकेच्या सासुबाई, असा सवाल करत आज समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी हे फलक काढून टाकले. महात्मा फुले वाडा हा फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचा लोकांसाठी प्रेरणास्थान आहे, अशा प्रकारे जर कोणी नाव देण्याचा प्रयत्न केला तर त्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरु, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
पुण्यातील ऐतिहासिक अशा फुले वाडय़ाच्या मुख्य प्रवेशद्वारावर 24 मे रोजी भाजपच्या माजी नगरसेविका विजयालक्ष्मी हिरहर यांच्या सासू ‘कै. लक्ष्मीबाई नारायणराव हरिहर’ यांच्या नावाचा फलक लावण्यात आला होता. तसेच त्याखालील फलकावर मार्गदर्शक म्हणून खासदार गिरीश बापट, आमदार मुक्ता टिळक यांचे नाव टाकण्यात आले होते. तर संकल्पना म्हणून महापौर मुरलीधर मोहोळ तसेच विजयालक्ष्मी हरिहर, सम्राट थोरात, आरती कोंढरे आणि अजय खेडेकर या चार नगरसेवकांची नावंही झळकत होती. या फलकांवरून समता परिषद, महात्मा फुले मंडळ, ज्योती मित्र मंडळ, अखिल भारतीय माळी समाज शिक्षण संस्था यांनी आक्षेप घेतला होता. पालिका आयुक्तांकडेही यासंदर्भात तक्रार करण्यात आली होती. दरम्यान, आज दुपारी समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत फुले वाडय़ावरील हे फलक हटवले.
महापुरुषांच्या स्मारकाच्या ठिकाणी नगरसेवकांकडून अशाप्रकारे चमकोगिरी केली जात असल्याने समाज माध्यम माध्यमांवर या प्रकारावर टीकेची झोड उठविण्यात आली होती. विशेष म्हणजे माजी नगरसेविका विजयालक्ष्मी हरिहर यांनी आपल्या या कृत्याचे समर्थन केले आहे. कमानीवर नाव लावण्यासाठी आम्ही पालिकेकडून मंजुरी घेतल्याचे त्यांनी सांगितले.