शीख दंगलीदरम्यान बाप-लेकाची हत्या : 18 फेब्रुवारीला न्यायालय ठोठावणार शिक्षा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
1984 च्या शीख विरोधी दंगलींदरम्यान झालेल्या हत्येशी संबंधित एका प्रकरणात दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना दोषी ठरवले आहे. आता 18 फेब्रुवारी रोजी सज्जन कुमार यांच्या शिक्षेबाबत न्यायालय निर्णय घेणार आहे. हे प्रकरण 1 नोव्हेंबर 1984 रोजी दिल्लीतील सरस्वती विहार परिसरात एका शीख वडील आणि मुलाच्या हत्येशी संबंधित आहे. या प्रकरणात, सज्जन कुमार यांच्यावर जमावाचे नेतृत्व केल्याचा आरोप आहे. तसेच त्यांच्या भडकवण्यावरूनच जमावाने दोन शिखांना जिवंत जाळल्याचा आरोप आहे.
1984 च्या शीख विरोधी दंगलीदरम्यान एका प्रकरणात काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना दोषी ठरवले आहे. या प्रकरणातील निर्णय 41 वर्षांनंतर आला आहे. हे प्रकरण सरस्वती विहारमध्ये 2 शिखांच्या हत्येशी संबंधित आहे. दिल्ली दंगलीत सज्जन यांच्यावर 30 हून अधिक खटले सुरू आहेत. एका प्रकरणात त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. याआधी डिसेंबर 2018 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाच्या दुहेरी खंडपीठाने त्यांना हिंसाचार आणि दंगल भडकवल्याबद्दल दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सध्या सज्जन तिहार तुरुंगात शिक्षा भोगत आहेत.
बाप-लेकाची हत्या
1 नोव्हेंबर 1984 रोजी जसवंत सिंग आणि त्यांचा मुलगा तरुणदीप सिंग यांची हत्या करण्यात आली होती. पंजाबी बाग पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता, परंतु नंतर एका विशेष तपास पथकाने तपास हाती घेतला. 16 डिसेंबर 2021 रोजी न्यायालयाने सज्जन कुमार यांच्याविरुद्ध या हत्या प्रकरणात आरोप निश्चित केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध प्रथमदर्शनी खटला असल्याचे आढळून आले. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान, फिर्यादी पक्षाने आरोप केला होता की जमावाने जसवंत यांच्या घरावर हल्ला केला होता. यामध्ये जसवंत आणि त्यांच्या मुलाची हत्या करण्यात आली होती. तसेच त्यांचे घरही लुटण्यात आले होते. यानंतर त्यांच्या घराला आग लावण्यात आली होती.
भाजपाची काँग्रेसवर टीका
‘आज सज्जन कुमार यांना शीखविरोधी दंगलींशी संबंधित आणखी एका प्रकरणात दोषी ठरवले. त्यांनी नरसंहार केला. काँग्रेसची सर्व पापे उघडकीस येत आहेत. मी देशाच्या पंतप्रधानांचे आभार मानतो ज्यांनी एसआयटी स्थापन केली आणि या लोकांना तुरुंगात टाकले. आज देवाने न्याय दिला’, अशी टीका न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी काँग्रेसवर केली.
‘40 वर्षांपूर्वी शीख हत्याकांडाचे नेतृत्व करणाऱ्या सज्जन कुमार यांना दोषी ठरवल्याबद्दल मी न्यायालयाचे आभार मानतो. सत्तेत आल्यानंतर एसआयटी स्थापन केल्याबद्दल मी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचेही आभार मानतो. बंद प्रकरणांच्या पुनर्तपासाचे हे परिणाम आहेत. जगदीश टायटलर प्रकरणातही आम्हाला न्याय मिळेल अशी आशा आहे.’ असे शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे सरचिटणीस जगदीप सिंग काहलोन म्हणाले.









