लोकसभा निवडणुकीकरता भाजपकडून उमेदवारी शक्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राजस्थानच्या नागौरच्या माजी खासदार डॉ. ज्योति मिर्धा यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीतील भाजप मुख्यालयात मिर्धा यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले आहे. ज्योति मिर्धा या मारवाडमधील शक्तिशाली राजकीय कुटुंबाच्या सदस्य आहेत. मिर्धा यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपला नागौर लोकसभा मतदारसंघात प्रबळ उमेदवार मिळाला आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत मिर्धा या काँग्रेसच्या उमेदवार होत्या. रालोआचे उमेदवार हनुमान बेनीवाल यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता. परंतु बेनीवाल यांच्या पक्षाची आता भाजपसोबत आघाडी नाही. यामुळे भाजपला नागौर मतदारसंघाकरता तगड्या उमेदवाराचा शोध होता.
ज्योति मिर्धा भाजपमध्ये सामील झाल्याने आता काँग्रेस आणि भाजपची राजकीय समीकरणे बदलून गेली आहेत. काँग्रेसला आता या मतदारसंघाकरता नवा चेहरा शोधावा लागणार आहे. तर बेनीवाल यांच्याकरता नागौर मतदारसंघ राजकीयदृष्ट्या अधिक आव्हानात्मक ठरला आहे.
भाजपने ज्योति मिर्धा यांना पक्षात प्रवेश देत नागौरमधील राजकीय समीकरणे साधण्याचा प्रयत्न केला आहे. मिर्धा कुटुंबाचा अजूनही नागौरच्या राजकारणावर प्रभाव आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते नाथुराम मिर्धा यांचे पुत्र भानुप्रकाश मिर्धा हे देखील भाजपच्या उमेदवारीवर नागौरचे खासदार म्हणून निवडून आले हेते. तर ज्योति मिर्धा या 2009 मध्ये खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. परंतु 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता.
भूपेंद्र हुड्डा शी कौटुंबिक संबंध
मिर्धा कुटुंब हे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्याशी नातेसंबंध बाळगून आहे. ज्योति मिर्धा यांची बहिण श्वेता या भूपेंद्र हुड्डाचे पुत्र अन् राज्यसभा खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा यांच्या पत्नी आहेत. मिर्धा कुटुंबातील आणखी काही नेते देखील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. काँग्रेसचे वरिष्ट नेते रिछपाल मिर्धा अन् त्यांचे पुत्र तसेच डेगानाचे आमदार विजयपाल मिर्धा हे भाजपमध्ये प्रवेश करू शकतात.
निवृत्त अधिकाऱ्याचा पक्षप्रवेश
सवाई सिंह चौधरी यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सवाई सिंह यांनी खिंवसर मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती. चौधरी हे निवृत्त आयपीएस अधिकारी आहेत.









