केकियांग यांना बाजूला सारून जिनपिंग झाले होते अध्यक्ष
वृत्तसंस्था/ बीजिंग
चीनचे माजी पंतप्रधान ली केकियांग यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. केकियांग यांनी एक दशकापर्यंत चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासोबत काम केले होते. 68 वर्षीय ली केकियांग हे शांघाय दौऱ्यावर असताना त्यांचे निधन झाले आहे.
केकियांग यांनी 10 महिन्यांपूर्वीच पंतप्रधानपद सोडले होते. प्रत्यक्षात ली केकियांग यांना जिनपिंग यांनी या पदावरून हटविले होते. त्यांच्यानंतर ली कियांग यांना पंतप्रधान करण्यात आले होते. ली कियांग हे क्षी जिनपिंग यांचे निकटवर्तीय आहेत. परंतु चीनच्या या झिरो कोविड धोरणावर जगभरातून टीका झाली त्याचे शिल्पकार ली कियांग हेच होते.
चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांनी केकियांग यांना पक्षातील महत्त्वाच्या पदांवरून बाजूला सारले होते. ली हे ऑक्टोबर 2007 मध्ये 17 व्या कम्युनिस्ट पक्षाच्या काँग्रेसमध्ये पॉलिट ब्युरो स्थायी समितीत सामील झाले होते. यूथ लीगमधील ली यांचा अनुभव आणि तत्कालीन चीनचे सर्वात मोठे नेते हू जिंताओ यांच्यासोबतची जवळीक पाहता केकियांग हे हू यांचे उत्तराधिकारी असल्याचे मानले जात होते.
2012 मध्ये पक्षनेता म्हणून हू जिंताओ यांचा कार्यकाळ समाप्त झाला होता. तेव्हा ली यांना पक्षाचे प्रमुखपद मिळणार असल्याची चर्चा होती, परंतु तेव्हाच क्षी जिनपिंग यांनी केकियांग यांना पक्षाच्या स्थायी समितीतील पदावरून हटविले होते.









