तपास यंत्रणेची मोठी कारवाई
वृत्तसंस्था/ कोची
केरळ सरकारच्या लाइफ मिशन प्रकल्पात झालेल्या घोटाळय़ाप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांचे माजी मुख्य सचिव एम. शिवशंकर यांना अटक केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणा मागील तीन दिवसांपासून शिवशंकर यांची चौकशी करत होती. मंगळवारी रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आल्याचे अधिकाऱयांकडून बुधवारी सांगण्यात आले.
वैद्यकीय तपासणीनंतर शिवशंकर यांना बुधवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. शिवशंकर हे 31 जानेवारी रोजी सेवानिवृत्त झाले होते. यापूर्वी सोने तस्करीप्रकरणी देखील शिवशंकर यांना अटक करण्यात आली होती.
लाइफ मिशन प्रकल्पाच्या अंतर्गत केरळच्या त्रिशूर जिल्हय़ातील वाडक्कनचेरी येथे गरीबांसाठी घरे उपलब्ध करण्यात येणार आहेत. या प्रकल्पा घोटाळा झाल्याची तक्रार 2010 मध्ये तत्कालीन काँग्रेस आमदार अनिल अक्कारा यांनी केली होत. यानंतर सीबीआयने एफसीआरए अंतर्गत गुन्हा नोंदविला होता. याप्रकरणी युनिटेक बिल्डर्सचे व्यवस्थापकीय संचालक संतोष एप्पन यांना आरोपी करण्यात आले होते. तसेच सेन व्हेंचर्स या कंपनीवरही आरोप झाला होता.
या प्रकल्पासाठीच्या ठेकेदार निवडीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अक्कारा तसेच काँग्रेस पक्षाने केला आहे. लाइफ मिशन प्रकल्पादरम्यान खासगी कंपन्या आणि अन्य घटकांनी एफसीआरएचे उल्लंघन केल्याचाही आरोप आहे. शिवशंकर यांना याप्रकरणी अटक झाल्याने विजयन यांच्या अडचणी वाढल्या आहेत.









