वयाच्या 79 व्या वर्षी बेंगळूर येथे निधन :
► वृत्तसंस्था / बेंगळूर
केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चंडी यांचे मंगळवारी सकाळी बेंगळूर येथे निधन झाले आहे. निधनासमयी ते 79 वर्षांचे होते. ओमन चंडी हे दीर्घकाळापासून आजारी होते आणि त्यांच्यावर बेंगळूर येथे उपचार सुरू होते. बेंगळूरमध्ये विरोधी पक्षांच्या बैठकीपूर्वी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले आहे.
केरळचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे निष्ठावंत ओमन चंडी हे जननायक होते. त्यांची अतूट निष्ठा आणि दूरदर्शी नेतृत्वाने केरळच्या विकास आणि देशाच्या राजकीय पटलावर मोठा ठसा उमटविला आहे. समर्पण आणि सेवावृत्तीसाठी त्यांना नेहमीच आठवणीत ठेवले जाईल असे काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांनी म्हटले आहे.
केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी ट्विट करत चंडी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आम्ही दोघेही एकाच वर्षी विधानसभेत निवडून गेलो होतो. तसेच आम्ही एकाचवेळी विद्यार्थीदशेतून राजकीय जगतात दाखल झालो होतो. अशा स्थितीत त्यांना निरोप देणे अवघड ठरत आहे. ओमन चंडी हे कुशल प्रशासक होते असे विजयन यांनी ट्विट करत म्हटले आहे.
प्रेमाच्या बळावर जग जिंकणाऱ्या नेत्याच्या कहाणीचा आज अखेर झाला. एक महान व्यक्तीच्या निधनामुळे मी दु:खी आहे. चंडी यांनी असंख्य लोकांचे जीवन सावरले होते असे केरळ काँग्रेस अध्यक्ष के. सुधाकरन यांनी म्हटले आहे.
दोनवेळा राज्याचे मुख्यमंत्री
ओमन चंडी हे 2004-06 आणि 2011-16 पर्यंत दोनवेळा केरळचे मुख्यमंत्री राहिले. 1970 च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून ते पहिल्यांदा आमदार झाले होते. तेव्हा ते केवळ 27 वर्षांचे होते. तेव्हापासून सलग 11 वेळा ते निवडणुकीत विजयी झाले होते. विधानसभेत त्यांनी 18,729 दिवस सदस्य म्हणून काम केले होते. चंडी यांनी चारवेळा विरोधी पक्षनेता म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती.









