तेव्हापासून आजही आम्ही सर्व संचालक एकत्रित आहोत
Gokul Election 2025 Vishwas Patil : गोकुळ दूध संस्थेचे विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी गोकुळच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास थेट नकार दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार राजीनामा देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
त्यामुळे आता डोंगळेंच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात आणि जिल्ह्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आले आहे. डोंगळे यांनी आज बोर्ड बैठीकाल हजेरी लावली नाही. दरम्यान, आता गोकुळ संस्थेचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, गोकुळ संस्थेमध्ये महाविकास आघाडी किंवा महायुती नाही. तर ही आमची राजर्षी शाहू आघाडी आहे. पॅनेल तयार केलं तेव्हा राजर्षी शाहू आघाडी असं पॅनेल नावं दिलं होतं आणि तेव्हापासून आजही आम्ही सर्व संचालक एकत्रित आहोत. नेतेमंडळी सांगतील त्यापद्धतीने बोर्ड मंडळी एकत्रित काम करु.
अरुण डोंगळे यांच्या राजीनामा संदर्भात काय करायचं ते आमचे नेते मंडळी ठरवतील. आम्ही सर्व संचालक एक संघ आहोत. अरुण डोंगळे यांनी आता त्यांची भूमिका ठरवावी, अशा शब्दांत त्यांनी अप्रत्यक्षरित्या डोंगळे यांची कानउघाडणी केली आहे.
दरम्यान, गोकुळसह जिल्ह्यात महायुतीची सत्ता आहे. खासदार, आमदार महायुतीचेच असल्याने त्यांची ताकद अधिक आहे. अध्यक्षपदासाठी कोणाचाही आग्रह नाही, मात्र गोकुळचा नवा अध्यक्ष महायुतीचाच असावा अशी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची इच्छा आहे. त्यामुळेच आज राजीनामा देऊ नका, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. गोकुळमध्ये महाविकास आघाडीचा चेअरमन नको, यावर मतभेद आहेत. त्यांच्या सूचनेनुसारच राजीनामा दिला नसल्याची स्पष्ट भूमिका डोंगळे यांनी घेतली आहे.








